महिलांनो, योगासनांनी आरोग्यसंपन्न व्हा ! योग दिन विशेष
महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एकाग्रता व कार्यक्षमता वाढल्याने महिला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये उत्साही, कार्यक्षम व आनंदी राहतील. मुलगी, पत्नी व माता या तीनही रूपात आरोग्यसंपन्न राहून या भूमिका ती यशस्वीपणे निभावू शकेल. निरोगी व दीर्घायुषी जीवन जगण्यासाठी शारिरिक व मानसिक कणखरपणा साधणे आवश्यक आहे.
- डॉ. प्रतिभा तीर्थगिरीकर सिरीया, पुणे
व्याधी झाल्यानंतर त्यावर उपचार करणे सगळ्याच उपचार पद्धतींत सांगितलेले आहे, मात्र अथर्ववेदाचा उपवेद असलेल्या आयुर्वेदात निरोगी व्यक्तीने स्वास्थ कसे राखावे व व्याधी होऊच नयेत, यासाठी कशा प्रकारच्या आहार विहाराचे आचरण करावे, याविषयी वर्णन केलेले आहे. स्वास्थ्याचे रक्षण व व्याधीचा नाश होण्यासाठी दिनचर्येत शरीराची स्वच्छता व पंचकर्म आयुर्वेदाला शरीरशुद्धीसाठी व दोषांच्या साम्यासाठी अपेक्षित आहेत. त्याचप्रमाणे, योगासने, मुद्रा, बंध, प्राणायाम आदी मार्गांनी योगसिद्धी मिळवण्यासाठी योगशास्त्राने प्रारंभी डोळ्यापासून गुदापर्यंत विविध शुद्धींचा उपयोग शरीरशुद्धीसाठी सांगितला आहे.
या योगिक शुद्धिक्रिया नियमित केल्याने महिलांचे सौंदर्य वृद्धींगत होईल व ते दीर्घकाळ टिकवणे शक्य होईल. महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासातही योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एकाग्रता व कार्यक्षमता वाढल्याने महिला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये उत्साही, कार्यक्षम व आनंदी राहू शकेल. महिलांच्या जीवनात अनेक स्थित्यंतरे घडत असतात. त्यामुळे शारिरिक व मानसिक संतुलन साधण्यासाठी नियमनाची गरज आहे.
जीवनातील स्थित्यंतरांमध्ये प्रामुख्याने कौमार्यवस्थेतून तारुण्यावस्थेत येताना रजोदर्शनाचा काळ, तारुण्यावस्थेत प्रजोत्पादनाची नैसर्गिक जबाबदारी आणि त्यानंतर प्रौढावस्थेतील रजोनिवृत्तीतून होणारे शारीरिक बदल, सामाजिक व कौटुंबिक स्थानात झालेला बदल, त्यातून येणाऱ्या जबाबदाऱ्या अशा महिलांच्या विविध अवस्था आढळतात. कौमार्यावस्था व तारुण्यावस्था यामध्ये सौंदर्यवृद्धी व सुडौलता टिकवून ठेवण्यासाठी महिला प्रयत्नशील असतात. शारीरिक स्वास्थ्य उत्तम असल्यास हे साध्य होईल.
आरोग्य आणि आहार
आहारातून दूध, फळे, हिरव्या पालेभाज्या, डाळी, उसळी योग्य प्रमाणात घेतल्यास आवश्यक जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके आणि शर्करायुक्त पदार्थ शरीराला मिळू शकतील. जास्त कर्बोदके व प्रथिनयुक्त आहार खाल्ल्यास वजन वाढते व त्यानंतर मेदोरोग (Obesity), उच्च रक्तदाब, मधुमेह आदी व्याधी होऊ शकतात. कंबरदुखी, पाठदुखी, निरुत्साह, अशक्तपणा यांसारख्या सामान्य तक्रारी टाळण्यासाठी पद्मासन, स्वस्तिकासन, सूर्यनमस्कार, पश्चिमोत्तासन, भुजंगासन, धनुरासन ही आसने अतिशय उपयुक्त आहेत. योगमुद्रा, सर्वांगासन, हलासन आदी आसने केल्याने उत्साह वाढतो. शीर्षासन केल्याने मेंदूला अधिक रक्तपुरवठा होतो. त्यामुळे चेहरा तजेलदार दिसतो. हलासन करताना योनीमार्गाचे जास्तीत जास्त आकुंचन होत असल्याने तेथील स्नायूंची कार्यक्षमता वाढते. मासिक पाळीचे त्रास टाळण्यासाठी योगाभ्यास लाभदायक आहे. पूर्ण पश्चिमोत्तासन, नौकासन, सुप्त वज्रासन, शशांकासन, उष्ट्रासन यासारख्या आसनांच्या अभ्यासाने ओटीपोटावर दाब पडून गर्भाशयाचे कार्य सुधारते व मासिक पाळीचा त्रास कमी होतो.
निरोगी बाळासाठी...
गर्भावस्थेदरम्यान नियमित प्रणवजप केल्याने त्याचे अतिशय चांगले परिणाम संशोधनाअंती सिद्ध झालेले आहेत. संपूर्ण नऊ महिने एकादशपासून सुरवात करून १०८पर्यंत ओंकार जप वाढवीत नेल्यास जन्माला येणारे बाळ निरोगी व सुदृढ निजपते. प्रसूतिपूर्व काही विशिष्ट हलकी आसने किंवा त्यासारख्या प्रक्रिया तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास प्रसूतिपूर्व समस्या दूर होऊन प्रसूती सुलभ होण्यास मदत होते. प्रसूतीनंतर अश्विनीमुद्रा मत्स्यासन, मूलबंध यांच्या अभ्यासाने गर्भाशय मूळ स्थितीला येते व इतर आसनांच्या साहाय्याने शरीराला आलेली स्थूलता व शिथिलता कमी होते. वयाच्या ४५ ते ५० वर्षानंतर बीजांडकोश आपले कार्य संपवतात. त्यामुळे स्त्रीबिजाची उत्पत्ती थांबते. यालाच रजोनिवृत्ती असे म्हणतात. त्यातून मानसिक व शारीरिक लक्षण संभवतात. या सर्वच
प्रकारच्या त्रासांवर योगाचरणाने नक्कीच फायदा होईल.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
आजच्या दैनंदिन जीवनात चिंता, काळजी, अशाश्वतता या गोष्टींपासून कुणाचीही सुटका नाही. तणावमुक्त जीवन जगायचे असल्यास ताण टाळा, आनंदी राहा सांगणे सोपे आहे. मात्र, प्रत्यक्षात आणणे अवघड आहे. तणावाची परिस्थिती समजून घेऊन त्याने डगमगून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मार्ग काढणे व आलेल्या परिस्थितीला हिमतीने सामोरे जाणेच उचित ठरते. यासाठी मन सुदृढ बनविणे गरजेचे आहे आणि हे नियमित योगाच्या आचरणाने सहज शक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.