‘फेक’वर लोककल्याणाचा नेरेटिव्ह भारी पडेल

‘फेक’वर लोककल्याणाचा नेरेटिव्ह भारी पडेल

Published on

पुणे, ता. २९ : मेट्रोच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम ठेवला म्हणून टीका करायची, नंतर पावसामुळे कार्यक्रम पुढे ढकलला तरी विरोधक टीका करतात. बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशी द्या म्हणणारे विरोधक आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्याने त्याला मारले तरीही प्रश्‍न उपस्थित करतात. राज्यातील विरोधक दुतोंडी असून ते काही केले तरी टीकाच करतात; पण त्यांच्या ‘फेक नेरेटिव्ह’ला आमचा लोककल्याणाचा नेरेटिव्ह भारी पडेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रोचे उद्‍घाटन यासह अन्य ११ हजार कोटी रुपयांच्या कामांचे उद्‍घाटन आणि भूमिपूजन ऑनलाइन झाले. त्यावेळी गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांना महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली, चौकश्‍या लावल्या. गुंतवणुकीत राज्य तीन नंबरला गेले होते; पण आम्ही पुन्हा एकत्र आल्याने लोकांच्या मनातील सरकार आणले. निर्णयावरील स्थगिती उठवली. देशात तीन नंबरला गेलेले राज्य पुन्हा पहिल्या नंबरला आणले आहे. महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असल्याने आजही कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रातच होत आहे. राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वर्षभरासाठीची तरतूद केली आहे. त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही. या योजनेत खोडा घालणाऱ्या विरोधकांना माझ्या बहिणी जोडा दाखवतील’’.

विकास, वारशाचा संगम
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘विकास प्रकल्पांचे उद्‍घाटन आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेचे भिडे वाड्यातील स्मारकाचे भूमिपूजन म्हणजे हा विकास आणि वारशाचा संगम आहे. पुण्यात मुसळधार पाऊस पडल्याने कार्यक्रम रद्द झाला. ज्यांनी मेट्रोचा एकही खांब उभारला नाही, ते लोक छात्या बडवत होते. पुण्यातील मेट्रोला २०१४ नंतर आम्ही गती देण्याचे काम केले. पुण्यातील मेट्रोचे काम देशात सर्वाधिक वेगाने सुरू आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी हा देशातील पहिला ‘पीपीपी’ प्रोजेक्ट आहे. स्वारगेट स्टेशनचे काम अपूर्ण असल्याची टीका करतात, पण हे स्टेशन देशातील पहिले मल्टिमॉडेल स्टेशन असून त्यात मॉलसह अनेक सुविधा असतील. पुणे सांस्कृतिक राजधानी आहेच, आर्थिक मॅग्नेटिक सेंटर आहे. पुढील पाच वर्षे कळ काढा, पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटेल.’’
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर वाढवण बंदर, वंदे भारत रेल्वे यांसह अनेक कामांचे उद्‍घाटन केले आहे; पण स्वतःच्या कारकिर्दीत काही करायचे नाही आणि आता आंदोलने करत आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांवर टीका केली.
छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

सामंतांचा मोबाईल हरवला
उद्योग मंत्री उदय सामंत याचा मोबाईल गणेश कला क्रीडा मंच येथील कार्यक्रमात हरविल्याची घटना घडली. हा मोबाईल सापडत नसल्याने सूत्रसंचालकांनी सामंत यांचा मोबाईल हरवला आहे, कोणाला सापडल्यास तो आणून देण्याचे आवाहन केले.

मोहोळ यांचे नाव घेताच टाळ्या
गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रमात राज्यातील प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते. मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर पुण्यात पहिलाच मोठा कार्यक्रम होत होता. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. कार्यक्रमादरम्यान भाषणात किंवा अन्य कारणांनी मोहोळ यांचे नाव घेताच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून
टाळ्या वाजवून, घोषणा देऊन आनंद व्यक्त करतानाच शक्तिप्रदर्शनही केले जात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.