Sharad Mohol
Sharad MoholEsakal

Sharad Mohol Case : खूनापूर्वी आरोपींचे वकिलाबरोबर संभाषण, बैठक झाल्याचीही पोलिसांची न्यायालयात माहिती

मोहोळ याचा खून करण्यासाठी वटकर आणि शेडगे यांनी मध्यप्रदेशमधून शस्त्रे मागविली व ती इतर आरोपींनी दिली असल्याचे तपासातून समोर आले
Published on

Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती.

तर ॲड. संजय उढाण याचे एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपी वकिलांना खुनाची माहिती होती, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी (ता. ११) न्यायालयात सांगितले.

मोहोळच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उढाण यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांच्यासह धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

मोहोळ याचा खून करण्यासाठी वटकर आणि शेडगे यांनी मध्यप्रदेशमधून शस्त्रे मागविली व ती इतर आरोपींनी दिली असल्याचे तपासातून समोर आले आहे. शस्त्रे पुरविणाऱ्या वितरकाचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींनी एकूण चार शस्त्रे मागविली होती. त्यातील तीन शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. आणखी काही शस्त्रे पुरविली आहेत का? याचाही शोध घेण्यात येत आहे, असे तांबे यांनी न्यायालयास सांगितले.

पिरंगुटला झाली होती बैठक

या गुन्ह्यातील आरोपींनी ऑक्टोबरमध्ये एक ते सहा तारखेदरम्यान मोहोळवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यासाठी आरोपीबरोबर दोन्ही वकिलांनी पिरंगुट येथे बैठक घेतली होती.

आरोपी नेमके कुठे भेटले? त्यांच्यासोबत आणखी काहींचा यात समावेश आहे का? या गुन्ह्यातील मास्टरमाईंड कोण आहे? याचा तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी केली.

दोन्ही आरोपी वकिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर नव्याने अटक केलेल्या दोन आरोपींची सात दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

आणखी अटक होण्याची शक्यता

आरोपींबरोबर बैठक झाल्यानंतर आरोपी वकिलांनी जुने सिमकार्ड टाकून दिले आणि नवीन सिमकार्डवरून एका व्यक्तीला फोन केला होता. हा गुन्हा संवेदनशील आहे. आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे, असे रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

आरोपींचे वकील ॲड. सुधीर शहा यांनी युक्तिवाद केला की, पोलिसांकडे कोणताही वेगळा पुरावा नाही. दोन्ही वकिलांनी सगळी माहिती पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची गरज नाही.

आरोपी विरुद्ध दिशेला का पळाले?

आरोपी वकिलांचे मुंबर्इतील पोलिस अधिकारी हर्षल कदम यांच्याबरोबर संभाषण झाले होते. त्यांनी आरोपींना नवी मुंबईत किंवा जवळच्या कोणत्याही पोलिस ठाण्यात हजर व्हा, असा सल्ला दिला होता. मात्र ते विरुद्ध दिशेला का पळाले?

असा सवाल तांबे यांनी बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर केला. कात्रज परिसरात दोन पोलिस चौक्या होत्या. नाकाबंदी लागली होती. तेथील पोलिसांना सांगितले असते की, आपण खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत तर त्यांना अटक केली असती, असे सांगत तांबे यांनी आरोपींचा शरण होण्याचा दावा खोडून काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.