Pune News : खडकी स्थानक आता ‘टर्मिनल’च्या रुळावर
Pune News : खडकी स्थानकावर नवे कोचिंग टर्मिनल होणार आहे. रेल्वे बोर्डाने पुणे विभागाच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे. फलाटाच्या विस्तारीकरणासह स्थानकाचाही विकास केला जाणार आहे. रेल्वे बोर्डाने यासाठी सुमारे ३५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
एक ते दोन महिन्यांत याच्या निविदा प्रक्रियेला सुरवात होईल. खडकी स्थानकावर टर्मिनल झाल्यास पुण्याहून सुटणाऱ्या काही रेल्वे गाड्या खडकी स्थानकावरून सुटतील. परिणामी, पुणे स्थानकावरचा ताण कमी होणार आहे.
पुणे स्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. हडपसर टर्मिनल करताना सुमारे ९८ कोटी रुपयांचा खर्च आला. हडपसरपाठोपाठ आता खडकी स्थानकाचा विकास केला जाणार आहे.
टर्मिनल करताना खडकी स्थानकावर प्रवासी सुविधा तर वाढतीलच, शिवाय वाहतुकीच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. फलाटांच्या संख्येत वाढ होईल. टर्मिनल झाल्यावर पहिल्या टप्प्यात सहा रेल्वेगाड्या खडकी स्थानकावरून सुटतील.
परिणामी, पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या कमी होईल. लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. येत्या दोन ते तीन वर्षांत हे टर्मिनल बांधले जाईल. पुणे स्थानकाजवळचे हे दुसरे टर्मिनल, तर विभागातील तिसरे टर्मिनल असणार आहे.
कसे असणार टर्मिनल?
खडकी स्थानकावर सध्या चार फलाट आहेत. यापैकी दोन फलाट रेल्वे वाहतुकीसाठी वापरले जातात, तर तिसरा रेल लेव्हल फलाट आहे. येथून सैन्याच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या रेल्वे ये-जा करतात. चौथा फलाट मालगाड्यांसाठी वापरला जातो.
टर्मिनल करताना प्रवासी रेल्वे गाड्यांसाठीच तो बनविला जाईल. खडकी टर्मिनल करताना चारही फलाट प्रवासी रेल्वेसाठी वापरले जाणार आहेत. शिवाय पादचारी पूल, प्रतिक्षालय, पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृह, मोफत वायफाय, पिण्याची पाण्याची सोय केली जाणार आहे. रेल लेव्हल असलेल्या फलाटाची उंची वाढविली जाणार आहे. त्यामुळे त्या फलाटावर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबा दिला जाणार आहे.
प्रवाशांना फायदा काय?
पुणे स्थानकावर रेल्वेची संख्या जास्त असल्याने फलाट उपलब्ध न होणे, नव्या गाड्या सुरू न होणे असे प्रकार घडतात. ते बंद होतील.
फलाट उपलब्ध नसल्याने अनेक रेल्वेंना होम सिग्नलवर वाट पाहत थांबावे लागते. यात २० ते २५ मिनिटे वाया जातात. ते आता थांबेल.
खडकी स्थानकावरून नवीन रेल्वे सुरू होतील.
पुणे स्थानकावरून दोन मिनिटांत गाडी सुटेल, त्यामुळे फलाट सहज उपलब्ध होतील.
आकडे काय सांगतात?
२५० -पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे
१ लाख ५० हजार - रोजची प्रवासी संख्या
६ - एकूण फलाट
खडकी स्थानकाची सद्य:स्थिती
फलाट : २
रोज थांबणाऱ्या रेल्वेगाड्या : चार एक्स्प्रेस व २६ लोकल
दैनंदिन प्रवासी संख्या : १५००
खडकी स्थानकावर नवे कोचिंग टर्मिनल होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्यात सुमारे ३५ कोटींची कामे केली जातील. रेल्वे बोर्डाने याला मंजुरी दिली आहे. या मुळे येत्या काळात खडकी स्थानकावरून काही प्रवासी गाड्या सुटतील आणि तिथेच प्रवास थांबवतील.
-डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.