राज्य सरकारकडून पैसे मिळेनात; कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिकेनेच केली ११९ कोटींची तरतूद
Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी दाट लोकवस्तीतील भूसंपादन रखडल्याने तेथील रस्त्याचे कामही ठप्प आहे. राज्य सरकारने घोषणा केलेले २०० कोटी रुपये अजून महापालिकेला मिळालेले नाहीत. त्यामुळे अखेर महापालिकेनेच अर्थसंकल्पात भूसंपादनासाठी ७४ कोटी आणि रस्त्याच्या कामासाठी ४५ कोटी अशी ११९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी होत असते. यासाठी महापालिकेने कात्रज ते खडी मशिन चौक या ३.५ किलोमीटरच्या रस्त्याचे ८४ मीटर रुंदीकरण करण्याचे काम २०१८ मध्ये सुरू केले.
हे काम सप्टेंबर २०२१मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. यासाठी १९५ जागामालकांच्या २ लाख ८८ हजार १२४ चौरस मीटर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. प्रकल्प सुरू होताना २ लाख १६ हजार ५९६ चौरस मीटर जागा देण्यासाठी प्राथमिक ताबे देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती.
प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर अनेक जागामालकांनी जागा ताब्यात देण्यास नकार दिला. त्यामुळे हा प्रकल्प रेंगाळला आहे. भूसंपादनातील अडथळ्यांमुळे हा रस्ता ८४ मीटरऐवजी ५० मीटरचा करण्याचा निर्णय घेतला. ]
त्यामध्ये भूसंपादनासाठी २८० कोटी रुपये लागणार असून, त्यातील २०० कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहेत. गेल्या वर्षभरापासून २०० कोटी रुपये मिळणार, असे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप ही रक्कम महापालिकेला मिळालेली नाही.
राजस सोसायटी चौक ते गोकुळनगर दरम्यानचे काम रखडले
राजस सोसायटी चौक ते गोकुळनगर दरम्यान दोन्ही बाजूंनी लहान भूखंड मालकांची संख्या जास्त आहे. त्यांनी ‘टीडीआर’, ‘एफएसआय’च्या रूपात मोबदला न घेता थेट रोख रक्कम देण्याची मागणी केली आहे.
कान्हा हॉटेल चौक ते खडी मशिन चौक या दरम्यान नवीन रस्ता तयार झाला, पण राजस सोसायटी चौक ते गोकुळनगर या दरम्यानचे काम रखडलेले आहे. या भागातील नागरिकांना रोख मोबदला देऊन जागा ताब्यात घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात भूसंपादनासाठी ७४ कोटी रुपयांची तरतूद प्रशासनाने केली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया किचकट व वेळखाऊ असल्याने प्राधान्याने त्यांचे प्रस्ताव मार्गी लावले तरच या रस्त्याच्या कामाला गती येऊ शकणार आहे.
राज्य सरकारकडून २०० कोटी रुपये मिळतील, पण महापालिकेनेही तरतूद केली आहे. मार्च २०२५ पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका.
असा होणार रस्ता
- ३.५ किलोमीटर रस्त्याची लांबी
- ८४ मीटरऐवजी ५० मीटरचा रस्ता होणार
- त्यापैकी ४२ मीटरचा मुख्य रस्ता
- दोन्ही बाजूंना चार मीटरचा पादचारी मार्ग व डक्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.