Maharashtra Revenue : राज्याला एकाच दिवशी १६० कोटींचा महसूल
पुणे : गुड फ्रायडेचा मुहूर्त आणि ३१ मार्चअखेरचे निमित्त साधत शुक्रवारी (ता. २९) दिवसभरात राज्यात दहा हजार दस्तांची नोंदणी झाली. त्यातून राज्य सरकारला १६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत आहे. एक एप्रिलपासून रेडीरेकरनरचे दर नव्याने लागू होतात. मागील वर्षी शासनाने रेडीरेकनरच्या दरात वाढ केली नव्हती.
यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दरात वाढ झाल्यास त्याचा परिणाम मुद्रांक शुल्काच्या रकमेत होईल. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दस्तनोंदणीसाठी कार्यालयात दरवर्षी नागरिकांची गर्दी उसळते. हा अनुभव लक्षात घेऊन सलग तीन दिवस शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्तनोंदणीची कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला आहे. शुक्रवारी गुड फ्रायडेनिमित्त शासकीय सुट्टी होती; मात्र पुणे, मुंबईसह राज्यभरातील दस्तनोंदणीची कार्यालये सुरू होती.
राज्यात शुक्रवारी दहा हजार दस्तांची नोंदणी झाली. त्यातून १६० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. राज्यात पाचशेहून अधिक दस्तनोंदणी कार्यालये आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून २७ दस्तनोंदणी कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांमध्ये शुक्रवारी दस्तनोंदणीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दी लक्षात घेऊन काही कार्यालयांना दोन तासांची वेळ वाढवून दिली होती.
पुण्यात ८५० दस्तांची नोंदणी :
पुण्यात दिवसभरात सुमारे ८५० दस्तांची नोंदणी झाली. त्यातून ३० ते ३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला, अशी माहिती नोंदणी विभागाने दिली. शनिवारी (ता. ३०) आणि रविवारी (ता. ३१) दस्तनोंदणीची कार्यालये सुरू राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.