अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या यादीत १३ हजार विद्यार्थी

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या यादीत १३ हजार विद्यार्थी

Published on

पुणे, ता. २२ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी तिसऱ्या नियमित फेरीत १३ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तिसऱ्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवारपर्यंत (ता. २४) प्रवेश निश्चित करता येणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांमधील एकूण एक लाख १९ हजार ७०५ जागांसाठी एक लाख ४९५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील ३५ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केले आहेत. या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत नियमित तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ६५ हजार १५४ जागा होत्या. या जागांवरील प्रवेशासाठी ४६ हजार ५९८ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यातील १३ हजार २७३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आहे. तिसरी फेरीत पाच हजार १४३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. तर दोन हजार ६७३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या, एक हजार ५८२ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. तिसऱ्या यादीत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मिळालेला प्रवेश निश्चित करणे, प्रवेशास जाण्यापूर्वी बाकी कागदपत्रे अपलोड करणे, महाविद्यालयात भेट देऊन प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे, तसेच प्रवेश नाकारणे ही प्रक्रिया बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थी लॉगिनमध्ये ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा. एखाद्या विद्यार्थ्याला मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, तर तो पुढील फेरीसाठी थांबू शकतो.
आगामी पुढील फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग एक भरण्याची प्रक्रिया दरम्यान सुरू असणार आहे. तसेच, प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. पुढील प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील गुरुवारी (ता. २५) जाहीर होणार आहे.

दृष्टिक्षेपात
महाविद्यालयांची संख्या : ३३८
प्रवेशासाठी एकूण जागा : १,१९,७०५
एकूण विद्यार्थी : ९०,४६५
प्रवेश घेतलेले विद्यार्थी : ३५,८७४
प्रवेश न घेतलेले विद्यार्थी : ५४,५९१

प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://pune.11thadmission.org.in/Public/Home.aspx

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com