चार तासांतच पुण्याला झोडपले
पुणे, ता. ४ : शहरात शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला जोरदार पाऊस पहाटे काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर रविवारी दुपारपर्यंत कायम होता. रविवारी सकाळ साडेनऊ ते दुपारी दीडच्या सुमारास जोरदार पाऊस असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते तर घराबाहेर पडलेले नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले होते. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूकही संथ झाली होती. एकीकडे जोरदार पाऊस व दुसरीकडे मुळा-मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या सोसायट्या, घरांमध्ये काही प्रमाणात पाणी शिरले, मात्र प्रशासनाने योग्य खबरदारी घेत नागरिकांचे स्थलांतर केल्याने तारांबळ टळली.
हवामान खात्याने शनिवारी मध्यरात्री व रविवारी दुपारी शहरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार, शनिवारी मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली. रविवारी पहाटेपर्यंत पाऊस कायम होता. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेला पाऊस दुपारी दीडपर्यंत कायम होता. पावसाला जोर असल्याने तीन ते चार तासांतच शहरातील बहुतांश रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. त्यामुळे अनेक वाहने रस्त्यातच अडकून पडले. रस्त्यांवरील पाण्यामुळे दुचाकी, कार, पीएमपी यांसारखी वाहनेही ठिकठिकाणी बंद पडल्याने वाहनचालक, प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक नागरिकांना प्रवासासाठी रिक्षा, कॅब यांसारखी वाहने न मिळाल्याने त्यांची काही प्रमाणात गैरसोय झाली. तर सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले, तर वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला.
नदीकाठावर यंत्रणा सज्ज
शहरात जोरदार सुरू असलेला पाऊस व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढविला होता. त्यामुळे पवना-मुळा नदीच्या काठावरील औंध, बोपोडी, खडकी, मुळा रोड, पाटील इस्टेट तर मुठा नदीकाठावरील सिंहगड रस्ता परिसरातील एकता नगरी, निंबसनगर, रजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, मंगळवार पेठ, मातोश्री रमाबाई आंबेडकर वसाहत (ताडीवाला रोड), येरवडा, शांतिनगर, खराडी येथील नदीकाठच्या नागरिकांना महापालिका प्रशासनाने शनिवारी रात्रीच सतर्कतेचा इशारा दिला होता. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाने पुरबाधित परिसरातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर केले होते.
मुसळधार पावसाचा फटका
- शनिवारी रात्री १० वा. : महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्ष, अग्निशामक दलाचे अधिकारी, याबरोबरच महापालिकेने पाचारण केलेल्या लष्कराचे जवानांनाही सतर्क ठेवण्यात आले होते.
- शनिवारी रात्री ११ वा. : महापालिका प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी हजर होते. पाणी वाढत असल्याने त्यांनी नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले, त्यास काही नागरिकांनी प्रतिसाद दिला. पण काहींनी प्रतिसाद दिला नाही.
- शनिवारी रात्री २ वा. : द्वारका सोसायटीत शनिवारी रात्रीच पाणी शिरले, तर श्यामसुंदर व जलपूजन सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये रविवारी दुपारी पाणी शिरले.
- रविवारी सकाळी १० : महापालिका प्रशासनाने सनसिटी भाजी मंडई, अनुश्री हॉल येथे नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली.
- रविवारी सकाळी १०.३० वा. : रजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, मंगळवार पेठेतील वस्त्यांमधील नागरिकांनाही प्रशासनाने दुसरीकडे हलविले.
- रविवारी सकाळी ११ वा. : पाटील इस्टेट वसाहतीमधील १०-२० घरांमध्ये दुपारी पाणी शिरले, त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित नागरिकांचे बसमधून तातडीने जवळील शाळेमध्ये स्थलांतर केले.
- रविवारी दुपारी १२ वा. : खडकवासला धरणातून रविवारी दुपारी १२ वाजण्यापूर्वी २९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्याने सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीच्या रस्त्यावर, तर विश्रांतीनगरच्या चौकात
पाणी आले होते.
- रविवारी दुपारी १२.१५ वा. : विठ्ठलवाडीच्या मंदिराकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली गेला.
- रविवारी दुपारी १२ वा. : फुलेनगर वस्ती, ताडीवाला रोड, शांतिनगर येरवडा येथील अनेक घरांना पुराच्या पाण्याचा फटका
बसला. रविवारची सुट्टी असल्याने आणि प्रशासनाने पुराबाबत वेळीच सतर्क केल्याने नागरिकांना तातडीने उपाययोजना करता आल्या.
- रविवारी दुपारी १२.३० वा. : नागरिकांनी तातडीने घरातील जीवनावश्यक वस्तू, कपडे, धान्य घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांचे महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्यात आले.
बोपोडीतील पक्षी विहार केंद्रात पाणी
पवना व मुळा नदीच्या संगमाच्या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता. सांगवी व बोपोडी येथे नदीपात्रात भराव, राडारोडा टाकल्याने पुराचे पाणी बोपोडी येथील छत्रपती शाहू महाराज पक्षी विहार केंद्रामध्ये शिरले. बोपोडी येथील गांधी नगर झोपडपट्टी परिसरातही पाणी शिरल्याने नागरिकांचे तेथून स्थलांतर करण्यात आले. खडकी येथील महादेव वाडी परिसरात काही प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रेंजहिल्स परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.