10th,12th Students : सन्मानाने भारावली वृत्तपत्र विक्रेत्यांची मुले
पुणे : ‘सकाळ माध्यम समूह’ व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे दहावी आणि बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान सोमवारी करण्यात आला. ‘सकाळ’च्या पुणे कार्यालयातील सभागृहात हा समारंभ पार पडला.
या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष राजीव जगताप, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, ‘सकाळ’चे सरव्यवस्थापक (वितरण) रवींद्र रायकर, पुणे आवृत्तीचे युनिट व्यवस्थापक रूपेश मुतालिक आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय वापराच्या भेटवस्तूंचा संच देऊन गौरविण्यात आले. यामध्ये साप्ताहिक ‘सकाळ’चा करिअर विशेषांकही उपलब्ध करून देण्यात आला. भविष्यातील करिअर निवडीसाठी त्याचा चांगला उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
जगताप यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध करिअरच्या उपलब्ध संधी, त्याच्या निवडीसाठी करावयाचे प्रयत्न आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
‘सकाळ’तर्फे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांना विक्रेत्यांकडून नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याचाच एक भाग म्हणून वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांसाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे रायकर यांनी नमूद केले.
गुणवंत विद्यार्थ्यांची नावे सरिता वंजारी यांना जाहीर केली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ‘सकाळ’च्या वितरण विभागातील वरिष्ठ व्यवस्थापक (इव्हेंट्स अँड अॅक्टीव्हीटी) संतोष कुडले यांनी केले. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सचिव अरूण निवंगुणे यांनी आभार मानले. या वेळी पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, वृत्तपत्र विक्रेते, त्यांचे कुटुंबीय, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे पदाधिकारी तसेच, ‘सकाळ’च्या व्यवस्थापन व वितरण विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
‘सकाळ माध्यम समूह’ व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा सर्वांना चांगला फायदा होतो. भविष्यकाळातही ही परंपरा सुरू राहील.
- विजय पारगे,
अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ
दहावी-बारावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाखाली करिअर निवडू नये. आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करावी. साप्ताहिक ‘सकाळ’ करिअर विशेषांकासारखी मार्गदर्शक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत, त्यांची मदत घ्यावी.
- राजीव जगताप,
अध्यक्ष, अभिनव एज्युकेशन ग्रुप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.