प्रकाश आंबेडकर रुग्णालयात; आज अँजिओप्लास्टी करणार
पुणे, ता. ३१ : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना आज पहाटे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंबेडकर यांच्या छातीत छोटी गाठ असून, उद्या (ता. १) त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार आहे, असे पक्षातर्फे अधिकृत पत्रक काढून माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, वंचितच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ सोडू नये, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.
प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल केले, त्यांची ऑजिओग्राफी केली जाणार आहे. अहवाल आल्यानंतर त्याची माहिती समाज माध्यमांतून सर्वांना दिली जाईल. त्यांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आहे. कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर गर्दी करू नये, असे आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल केले, त्यांची ऑजिओग्राफी करण्यात आली आहे. उजव्या बाजूच्या धमणीमध्ये छोटी गाठ आढळून आली आहे. शुक्रवारी अँजिओप्लास्टी करून ही गाठ काढली जाणार आहे. प्रकृती स्थिर असून, दुपारी त्यांनी व्यवस्थित जेवण केले आहे, असे वंचितच्या एक्स या समाजमाध्यम खात्यावरून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस आंबेडकर हे डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. या काळात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या नेतृत्वात निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती यासह अन्य पक्षाचे काम सुरु राहील, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.