तरुणाईची मते ठरणार निर्णायक
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १ : पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात १८ ते १९ या वयोगटातील मतदारांच्या संख्येत लोकसभा निवडणुकीनंतर सुमारे ६९ हजार ९६४ ने वाढ झाली आहे. तर २० ते २९ या वयोगटातील मतदार संख्येत एक लाख ६४ हजार ६५१ ने वाढ झाली आहे. १८ ते २९ या वयोगटातील मतदार संख्येत एकूण दोन लाख ३४ हजार ९२ ने वाढ झाली असून, ही मते निर्णायक ठरणार आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून लोकसभा निवडणुकीसाठी २३ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या ७१ हजार ५८८ तर एकूण मतदार ८१ लाख २७ हजार १९ इतके होते. नवमतदारांच्या संख्येचे प्रमाण हे अवघे ०.८८ टक्के होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करण्यास आयोगाने मान्यता दिली. त्या कालावधीत नवमतदारांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ‘स्वीप’ कार्यक्रमाच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे या वयोगटातील मतदारांच्या संख्येत वाढ होऊन ९५ हजार २७५ इतकी झाली होती. आठ एप्रिल रोजी एकूण मतदार संख्या ८२ लाख ९२ हजार ९५१ इतकी झाली. तेव्हा नवमतदारांची संख्या वाढून जवळपास १.७५ टक्के इतकी झाली होती.
लोकसभा निवडणुकीसाठी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत २० ते २९ या वयोगटातील मतदारसंख्या १३ लाख ६५ हजार ६५१ इतकी होती. मतदार यादीत या वयोगटातील मतदारांचा टक्का १६.४७ टक्के इतका होता. विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत या वयोगटातील मतदारांची संख्या १५ लाख २९ हजार ७७९ इतकी झाली आहे. यावरून लोकसभा निवडणुकीनंतर या वयोगटातील मतदार संख्येत जवळपास एक लाख ६४ हजार १२८ ने वाढली आहे. त्यामुळे या मतदारांची टक्केवारी आता १७.४८ वर गेली आहे.
१) जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर काही दिवसातच निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात आली. तर मतदार याद्यांची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले.
२) १५ ऑक्टोबरला जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या एक लाख ६५ हजार २३९ एवढी झाली आहे.
३) लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारांच्या संख्येत जवळपास ६९ हजार ९६४ ने वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण मतदार संख्येच्या तुलनेत नवमतदारांच्या संख्येचे प्रमाण हे आता १.८८ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नवमतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत.
जिल्ह्यात १७ लाख तरुण मतदार
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार संख्या ८७ लाख ५७ हजार ४२६ इतकी आहे. त्यामध्ये १८ ते १९ आणि २० ते २९ या अशा दोन्ही वयोगटातील मतदार संख्येत जवळपास दोन लाख ३४ हजार ९२ ने वाढ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास १६ लाख ९५ हजार १८ इतकी झाली आहे. एकूण मतदार संख्येच्या तुलनेत या दोन्ही वयोगटातील मतदारांची संख्या विचारात घेतली, तर ती १९. ३५ टक्के इतकी आहे.
कसबा मतदारसंघात सर्वात कमी मतदार
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये सर्वात कमी मतदार कसबा विधानसभा मतदारसंघात आहेत. या मतदारसंघातील मतदारांची संख्या दोन लाख ८२ हजार २७५ इतकी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत दोन लाख ३४ हजार ९२ मतदारांची नव्याने भर पडली आहे. ती विचारात घेतली तर जवळपास कसबा विधानसभा मतदार संघाएवढी नवीन मतदार संख्येत वाढ झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.