सांधेदुखीच्या रुग्‍णांमध्ये होतीये वाढ

सांधेदुखीच्या रुग्‍णांमध्ये होतीये वाढ

Published on

पुणे, ता. २३ ः दर महिन्याला उपचारासाठी येणाऱ्या ३० ते ५० वयोगटातील रुग्‍णांमध्‍ये सांधेदुखीच्या समस्येत वाढ होत आहे. याचे प्रमुख कारण हे वर्क फ्रॉम होम यासह ‘इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा होणारा अतिरिक्त वापर हे दिसून येत आहे. हे टाळण्‍यासाठी कामाच्‍या स्‍वरूपात व जीवनशैलीत बदल करण्‍याबरोबरच संगणक, मोबाईल, लॅपटॉप यांचा वापर अतिरिक्‍त वापर करणे टाळायला हवे. तसेच व्‍यायाम करायला हवा असे अस्थिरोगतज्‍ज्ञांचे मत आहे.
घरातून काम करणाऱ्यांना या संधिवाताचा धोका जास्त दिसून येत आहे. वर्क फ्रॉम होम दरम्यान एका जागी जास्त वेळ बसावे लागते. ज्यामुळे स्नायू घट्ट होतात आणि सांधे कडक होतात. कामाच्या ठिकाणी चुकीच्‍या अवस्‍थेत काम केल्याने सांध्यांना जास्त नुकसान होऊ शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. कार्यालयातही आवश्यक विश्रांती न घेता डिजिटल स्क्रीनसमोर बसण्याचा कालावधी वाढला आहे.
दर महिन्याला ३०-५० वयोगटातील १० रुग्ण संधिवाताच्या त्रासामुळे उपचारासाठी येतात. यातील ३-४ जणांना सांधेदुखीचा त्रास असतो. वर्क फ्रॉम होम आणि सतत इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बैठ्या जीवनशैलीमुळे हे होऊ शकते. सांधेदुखी किंवा संधिवात होण्याचा धोका कमी करण्‍यासाठी घरून काम करणाऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा. आहारात नियमित बेरी, ब्रोकोली, भोपळी मिरची, मशरूम, संत्री, पालक आणि नट यांसारखे दाहक-विरोधी पदार्थ खावेत. याशिवाय, कामाच्या वेळेत वारंवार ब्रेक घ्या व फिजिओथेरपी घ्या, असा सल्‍ला अस्थिरोगतज्‍ज्ञ डॉ. आशिष अरबट यांनी दिला.

का वाढतोय संधिवाताचा त्रास?
– व्हिडिओ कॉल, मिटींगमुळे मान, खांदा आणि मणक्यावर ताण येतो.
– घरून काम करण्याच्या सवयीमुळे शारीरिक हालचाल होत नसल्याने वजन वाढते.
– वाढत्या वजनामुळे सांध्यावर दबाव येतो, वेदना आणि सूज येते.
– वर्क फ्रॉम होम या जीवनशैलीचा परिणाम असतो.
.................
या उपाययोजना करा
–नियमित व्यायाम करा
– प्रत्येक ४५ मिनिटांनी उभे राहण्याची आणि स्ट्रेच करा. त्‍याची आठवण करून देण्यासाठी मोबाईलवर टायमर सेट करा.
– योगासने केल्‍यानेही आराम मिळतो
– काम करताना पाठीला सपोर्ट देणारी खुर्ची वापरा आणि पाय जमिनीला टेकत असल्‍याची खात्री करा
– मानेचा ताण आणि वेदना कमी करण्यासाठी स्क्रीन डोळ्याच्या पातळीवर ठेवा
– सांधेदुखी आणि लठ्ठपणा दूर ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.