Viral Infection: ताप सर्दी अंगदुखीमुळे हैराण झालाय ? पुण्यात वाढले रुग्ण, अशी घ्या काळजी
पुणे, ता. १६ : शहरात आठ दिवसांपूर्वी सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, दिवसा ढगाळ हवामान, मध्येच उकाडा आणि रात्री गारवा अशा संमिश्र वातावरणामुळे पुणेकर सर्दी, घसादुखी, खोकल्याने हैराण झाले आहेत. विषाणूजन्य जंतूंचा संसर्ग वाढत असल्याने आजार बळावत असून, काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
महिनाभरापासून शहरातील वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांच्या संख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवत असून, दुपारी कडक ऊन पडत आहे. हे वातावरण सर्दी, खोकला, ताप आणि अपचन यांसारख्या आजारांसाठी पोषक ठरत आहे.
घरातील एका व्यक्तीला संसर्ग झाल्यास त्याची लागण अन्य मंडळींनी होत आहे. सर्दी, खोकला, तापाची साथ असून, अपचनाचे विकार आणि हात-पाय दुखण्यामुळे नागरिक त्रासले आहेत. काही रुग्णांना ताप कमी झाल्यानंतरही खोकला आणि घसादुखीचा त्रास जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जनरल फिजिशियन डॉ. शुभदा जोशी म्हणाल्या, ‘‘बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्यासह तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहेत. आठ दिवसांपासून सर्दी, ताप, खोकल्याच्या तक्रारी असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या सातत्याने हवामानात बदल होत आहेत. रुग्णाला ताप येतो आणि साधारणतः तीन ते पाच दिवस राहतो. सध्याच्या परिस्थितीत तीन दिवसांपर्यंत ताप राहू शकतो. फ्ल्यूचा संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाहेरून घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. स्वच्छ, शुद्ध पाणी प्या, बाहेरचे खाणे टाळा, अस्वच्छ ठिकाणी पाणी पिणे टाळा; अन्यथा टायफॉईड, कावीळ, गॅस्ट्रो, अतिसारसारख्या आजारांना आमंत्रण मिळते.’’
जनरल फिजिशियन डॉ. शशांक भैलुमे म्हणाले, ‘‘सध्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ताप, अंगदुखी, सर्दी, खोकल्याची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला हे आजार रुग्णांमध्ये दिसत आहेत. हवामानातील बदलांमुळे आजारांची लक्षणे दिसत आहेत. आजार बरा व्हायला वेळही लागत आहे.’’
लहान मुलांसह ज्येष्ठांना जास्त त्रास
या बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना संसर्गजन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, जुलाब आणि उलट्यांनी मुलांसह ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत.
अशी घ्या काळजी
- जेवणापूर्वी हात धुवा
- शिळे अन्न खाऊ नका
- ताजी फळे खा
- आहारात फळांचा रस, नारळपाणी, सूप यासारख्या गोष्टींचा समावेश करा
- अन्नपदार्थ झाकून ठेवा
- बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा
- गर्दीपासून दूर राहा
- मास्क लावा
- पावसात भिजू नका
- अधिक काळ ओले कपडे घालू नका
सर्दी, खोकला, ताप या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये संसर्गजन्य आजाराचे रुग्ण अधिक आहेत. यामागे सध्या बदलते वातावरण, प्रदूषण आणि विषाणूंचा वाढत प्रादुर्भाव ही करणे आहेत.
-डॉ. राजेंद्र जगताप, जनरल प्रॅक्टिशनर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.