BBA, BCA and BMS Courses : बीबीए, बीसीएबाबत दिशाभूल नको
पुणे : बीबीए, बीसीए आणि बीएमएस हे अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) आपल्या अखत्यारित घेतल्यानंतर राज्यात संभ्रम निर्माण झाला आहे. अभ्यासक्रमाचे शुल्क वाढेल, महाविद्यालयांवर जाचक अटी लादल्या जातील, अशी चर्चा सध्या सुरू आहे. यामुळे महाविद्यालयांसह सर्वसामान्य विद्यार्थी भरडला जात आहे. संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रश्नांबद्दल थेट एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांच्याशी साधलेला हा संवाद...
१) महाविद्यालयांना पायाभूत सुविधा वाढवाव्या लागणार का?
डॉ. अभय जेरे : एआयसीटीई म्हणून आम्ही अत्यंत पारदर्शकतेने ही प्रक्रिया पार पाडत आहोत. देशभरातील साडेचार हजार महाविद्यालयांना आम्ही ‘जैसे थे’ स्वीकारले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांना लागू असलेले नियम त्यांच्यासाठी नाहीत. त्यामुळे लगेचच पायाभूत सुविधा वाढविण्याचा प्रश्नच येत नाही. बीबीए, बीसीए अभ्यासक्रम राबविणारी महाविद्यालये आणि संस्थांशी चर्चा करूनच पुढील काळात स्वतंत्र नियम तयार करण्यात येणार आहेत.
२) एआयसीटीईचे संलग्नता शुल्क अवाजवी आहे?
डॉ. जेरे : एआयसीटीईने ६० विद्यार्थ्यांमागे फक्त २० हजार रुपये संलग्नता शुल्क घेतले आहे. माझ्या मते हे माफक शुल्क असून, यामुळे अभ्यासक्रमाच्या शुल्कात वाढ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
३) एआयसीटीईच्या निकषांमुळे अभ्यासक्रमांच्या शुल्कात वाढ होईल?
डॉ. जेरे : महाविद्यालयांना जसे आहे तसे आम्ही संलग्नता प्रदान केली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी असणारे निकष बीबीए, बीसीए महाविद्यालयांना नाही. लगेचच कोणत्याही सुविधा वाढवायच्या नाहीत, संलग्नता शुल्कही माफक आहे. त्यामुळे मला वाटते लगेचच शुल्कवाढीचा कोणताच प्रश्नच नसावा. संबंधित महाविद्यालयांशी चर्चा करूनच नवीन नियम तयार करण्यात येणार आहेत.
४) प्राध्यापकांची संख्या वाढवावी लागणार का?
डॉ. जेरे : अभियांत्रिकी महाविद्यालयांना २० विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असा नियम आहे. मात्र, बीबीए बीसीए महाविद्यालयांसाठी चर्चेअंतीच हा निकष निश्चित केला जाईल. मला वाटते ६० विद्यार्थ्यांच्या तुकडीला उत्तम अध्यापनासाठी निदान तीन प्राध्यापक तरी असायला हवेत. त्यामुळे अवाजवी प्राध्यापक वाढविण्याचा विषयच उद्भवत नाही.
५) एमबीएची महाविद्यालये वाचविण्यासाठी हा एआयसीटईचा प्रयत्न आहे?
डॉ. जेरे : संसदेच्या कायद्यानुसार व्यवस्थापन आणि तंत्र अभ्यासक्रम एआयसीटीईच्या अंतर्गत येतात. उलट एकप्रकारे एआयसीटीईने आपल्या नियमांची अंमलबजावणीच केली आहे. तसेही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पदवी अभ्यासक्रमात अनेक बदल होत आहेत. मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट, इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आदींसाठी हे पदवी अभ्यासक्रम एआयसीटीईकडे असणे गरजेचे आहे.
६) एआयसीटीईकडे आल्यावर काय फायदा?
डॉ. जेरे : बीबीए, बीसीए महाविद्यालयांना आम्ही लगेच कोणतेच नियम लादलेले नाहीत. उलट त्यांच्या अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारत ५० ते १०० प्राध्यापक विकास कार्यक्रमही राबविणार आहोत. विकसित भारतासाठी आम्ही शैक्षणिक दर्जावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मॉडेल आराखडा तयार केला आहे. तसेच तीन हजार मुलींसाठी शिष्यवृत्तीची घोषणा देखील एआयसीटीईने केली आहे.
७) पुरेशी जागृती न झाल्यामुळे सीईटीला अनेक विद्यार्थी मुकले आहेत. पुन्हा सीईटी घेतली जाणार का?
डॉ. जेरे : अभ्यासक्रमांचे प्रवेश, प्रशासन आणि परीक्षेचा भाग
एआयसीटीईच्या अखत्यारीत येत नाही. आम्ही तर प्रवेशासाठी कोणताही बदल सांगितलेला नाही. राज्य शासनाने या संदर्भात निर्णय घ्यायचा असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.