Pune Dam Water Level : ‘खडकवासला’तील विसर्ग @४५,०००; पाणीसाठा ८५.५३ टक्के तर पानशेत, वरसगावातील विसर्ग १२ हजार क्युसेकने
खडकवासला : पानशेत आणि वरसगाव धरणात रविवारी (ता. ४) पहाटे दोन वाजल्यानंतर झालेल्या पावसामुळे चार वाजण्याच्या सुमारास पाणीपातळी वाढली. सकाळी धरणाच्या भिंतीच्या परिसरात चार तास अतिवृष्टी झाली अन् पाणीपातळी वाढल्याने दोन्ही धरणातून दिवसभरात टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढला.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन्ही धरणातून प्रत्येकी बारा हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडावा लागला. खडकवासला धरणातून पाच वाजता ४५ हजार क्युसेक विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला. खडकवासला धरणात १.६९ टीएमसी म्हणजे ८५.५३ टक्के पाणीसाठा जमा आहे. कालव्यातून एक हजार पाच क्युसेक, तर मुठा नदीत ४५ हजार ७०५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४६ मिलिमीटर पाऊस झाला.
पानशेत, वरसगाव दोन्ही धरणात सुमारे ९३ टक्के पाणीसाठा कायम ठेवत पावसाचे धरणात अतिरिक्त जमा होणारे पाणी नदीत विसर्ग करण्यात येत होता. पानशेत येथे सायकांळी पाच वाजता १०.१० टीएमसी म्हणजे ९४.८४ टक्के धरण भरले. पानशेतमधून एकूण १२ हजार ४३२ क्युसेक पाणी सोडले. येथे सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४९४ मिलिमीटर पाऊस झाला.
वरसगावला सायकांळी पाच वाजता ११.९६ टीएमसी म्हणजे ९३.२६ टक्के धरण भरले. वरसगावमधून एकूण १२४५८ क्युसेक पाणी सोडले. येथे पाच वाजेपर्यंत १०२ मिलिमीटर पाऊस झाला. टेमघर येथे सायकांळी पाच वाजता ३.७१ टीएमसी म्हणजे १०० टक्के धरण भरले. या धरणातून वीज निर्मितीसाठी २७५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. पाच वाजेपर्यंत ११० मिलिमीटर पाऊस झाला.
वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून...
खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने जास्त पाणी सोडणार असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती घेतली. पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप हे दुपारी तीन वाजता खडकवासला धरण परिसरात आले. त्यांनी धरण साखळीतील चारी धरणांची सध्याची परिस्थिती, सकाळपासून पडलेला पाऊस आणि सोडण्यात येणारे पाणी याची माहिती घेतली. पावसाच्या प्रमाणानुसार धरणातील विसर्ग कमी-जास्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काही वेळाने महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.