सोमेश्वरनगर - ‘कोरोना लसीकरण (Corona Vaccination) सुरू झालतं म्हणून धाडसाने दहा एकर टोमॅटो (Tomato) केला होता. पण, कडक लॉकडाउन (Lockdown) पडला आणि टोमॅटोचा बाजारही पडला. २३ किलोचे क्रेट अवघ्या ऐंशी रुपये दराने जातेय. भांडवल (Capital) सोडा... तोडणी आणि वाहतूक खर्चही (Transport Expenditure) निघत नाही. मी अकरा लाख रुपये खर्च केलाय आणि अवघे सत्तर हजार मिळालेत...’ टोमॅटो उत्पादकांची प्रातिनिधिक व्यथा शेंडकरवाडी (ता. बारामती) येथील ऋतुराज रतनराव काकडे (Ratanrao Kakade) यांनी मांडली. (Tomato Production Loss by Lockdown)
चालू हंगामात टोमॅटोला नीचांकी भाव मिळत असल्याने आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने हंगाम वाया गेला आहे. एकट्या सोमेश्वरनगर परिसरात शेतकऱ्यांचे सुमारे वीस कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बारामती तालुक्यातील निंबूत ते वडगाव निंबाळकर या पट्ट्यात दीड हजार शेतकऱ्यांनी सुमारे दोन हजार एकर टोमॅटोची लागवड केली आहे. मागील वर्षी लॉकडाउनने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, जानेवारीपासूनच लसीकरण सुरू झाल्याने या वर्षी लॉकडाउनची वेळ येणार नाही, असा कयास शेतकऱ्यांनी बांधला. परंतु, लसीकरणाचा खेळखंडोबा झाला आणि एप्रिल, मेमधील सुगीचे दिवस अक्षरशः पाण्यात गेले. विषाणूजन्य रोगांमुळे आधीच माल बाद होत आहे.
अशात तेवीस-चोवीस किलोचे एक क्रेट व्यापारी ऐंशी ते शंभर रुपयांना मागत आहेत. यामुळे भांडवल तर निघतच नाही. परंतु, तोडणी करणाऱ्या मजुरांचा पगार करायला आणि वाहतूक गाडीचे भाडे द्यायलाही मुश्कील होत आहे. औषध व खत दुकानदारांची बिले थकली आहेत. परिणामी काही शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून द्यायलाही सुरवात केली आहे. त्यावर मेंढ्या ताव मारताना दिसत आहेत.
ऋतुराज काकडे म्हणाले, ‘कोरोनाने बाजारपेठा, कंपन्या, हॉटेल, आठवडे बाजार बंद असल्याने उठाव मिळेना. टोमॅटो हे खर्चिक पीक आहे. मशागत, खते, सुतळी, बांबू, औषध फवारणी, खुरपणी, बांधणी यासाठी किमान एक ते सव्वा लाख रुपये खर्च येतो. तो वाया जाणार आहे. उत्पन्नातून फक्त मजुरीच निघू शकते.’
सव्वा लाख खर्च करून एक एकर टोमॅटो केला आहे. कोरोनाचा धोका पत्करून बाजारात जातोय. शंभरला क्रेट गेला तरी त्यामागे पस्तीस रुपये वाहतूक आणि तीस रुपये तोडणी खर्च आहे. उरलेल्या पैशात काय भागणार? विषाणूजन्य आजाराने निम्मा माल फेकून द्यावा लागत आहे. परिसरातला दीड हजार शेतकरी टोमॅटोने अक्षरशः झोपला आहे.
- पोपटराव बेलपत्रे, टोमॅटो उत्पादक
आंबेगावात मिळेल त्या भावात विक्री
पारगाव - आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील टोमॅटो पिकावर विषाणूजन्य तिरंगा रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने उत्पादन चांगले निघूनही फळ पिवळसर होऊन आतून खराब होत असल्याने मिळेल त्या भावात टोमॅटो विकावे लागत आहे. योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पारगाव, काठापूर बुद्रुक, लाखणगाव, खडकवाडी, धामणी, देवगाव, पोंदेवाडी आदि गावात शेतकरी टोमॅटोची शेती मोठ्या प्रमाणावर करतात. टोमॅटो पिकासाठी भांडवली खर्चही जास्त असतो काही गावात टोमॅटोचे उत्पादन सुरु झाले आहे. परंतु, काही शेतकऱ्यांच्या शेतातील टोमॅटोच्या पिकावर तिरंगा रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने उत्पादन चांगले निघूनही टोमॅटोला लाल रंग येण्याऐवजी पिवळा रंग आला आहे. टोमॅटो आतून वाफाळल्यासारखे होऊन खराब होऊ लागले आहे. त्यामुळे अशा टोमॅटोला २० किलोच्या एका क्रेटला अवघे ९० ते १०० रुपये बाजारभाव मिळत आहे. उत्पादन चांगले मिळूनही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे, अशी माहिती पारगाव येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी अजय ढोबळे व विजय ढोबळे यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.