Devendra Fadnavis : महिलांच्या सुरक्षिततेसह सायबर गुन्ह्यांची उकल करण्यास सर्वोच्च प्राधान्य

महिलांची सुरक्षितता आणि सायबर गुन्ह्यांची उकल करण्यास राज्य सरकारकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

पुणे - महिलांची सुरक्षितता आणि सायबर गुन्ह्यांची उकल करण्यास राज्य सरकारकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. महिला व बालकांवरील अत्याचार आणि अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशा प्रकरणांत पोलिस कर्मचारी सहभागी आढळल्यास त्यांना नोकरीतून थेट बडतर्फ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात शुक्रवारी (ता. ११) सुमारे ७२० कोटींच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि शुभारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे शहर पोलिस दलातील सात आणि पिंपरी चिंचवडमधील चार पोलिस ठाण्यांचे उद॒घाटन, पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या संगणकीय प्रकल्पाचे आणि मीरा- भाईंदर पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस ठाण्याचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले.

केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार राम शिंदे, उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, पोलिस महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) संजय वर्मा, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘पुणे शहर अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजिन म्हणून ओळखले जाते. पुणे मॅन्युफॅक्चरिंग, टेक्नॉलॉजी व स्टार्टअप कॅपिटल आहे. शहराच्या वाढत्या नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हाने वाढली आहेत. त्याचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी पोलिसांना गुणात्मक परिवर्तन करावे लागेल.

यासाठी ६३ वर्षांनंतर नवीन निकषांसह पोलिस विभागाचा नवीन आकृतिबंध तयार केला आहे. माझ्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यात ४० हजार पोलिस कर्मचाऱ्यांची भरती झाली. नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसह मनुष्यबळ उपलब्ध करून निधीचीही तरतूद केली आहे.’

ते म्हणाले, ‘देशामध्ये सर्वांत अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात आहे. साडेसातशे कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली आहे. सायबर गुन्हेगारांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी क्षमता सायबर केंद्रामध्ये तयार केली आहे. शहर सुरक्षित करण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत.’

अमितेश कुमार म्हणाले, ‘नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलिस कटिबद्ध आहेत.’ चौबे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी ताथवडे येथे नवीन जागा मिळाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय निश्चितच गुणात्मक बदल घडवून आणेल.’

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

- पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त आयुक्तासह आणखी एक पोलिस उपायुक्त देणार

- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी ताथवडे येथे ५० एकर जागेस मंजुरी

- अंधाऱ्या, दुर्गम घाट भागात सीसीटीव्ही, वीज व्यवस्था, नाईट व्हीजन कॅमेरे बसवावेत

- कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलिस सक्षम

- बोपदेव घाट प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद

फडणवीस यांच्याकडून अजित पवारांचे कौतुक -

पुणे पोलिस आयुक्तालयाची नवीन सुसज्ज इमारत कशी असावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा केला. पवार यांनी या इमारतीचा आराखडा स्वत: लक्ष घालून तयार केला. त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्राविषयी असलेली जाण कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.