औंध - पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि अरुंद रस्त्यांच्या समस्येमुळे सूस गावातील वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. विशेषतः तापकीर वस्ती, सूसगाव ते सनीज वर्ल्डपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
पाषाणहून पिरंगुट, पौड, हिंजवडी, मुळशीकडे जाणारी सगळी वाहने सूस गावातूनच जातात. तसेच येणारी वाहने सुद्धा याच मार्गाने येतात. अशातच हा रस्ता अरुंद असल्यामुळे येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
या मार्गावरून हिंजवडीतील आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या वाहनांसह ध्रुव इंग्लिश स्कूल, विद्या व्हॅली, सिंबायोसिस रुग्णालय आणि आयएसबीएम अशा विविध संस्थांमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते.
परंतु, त्याप्रमाणात मोठे रस्ते नसल्याने सूस गावातील स्मशानभूमी, शिवबा चौक, सनीज वर्ल्ड याठिकाणी दररोज कोंडी होते. कोंडीमुळे वाहनचालकांच्या इंधन व वेळेचा अपव्यय होत असल्याने त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
सूसच्या दिशेने येणारा पाषाण-सूस रस्ता मोठा असला तरी तापकीर वस्ती, ननावरे पुलाकडून येणारी वाहने आणि पाषाण व महामार्गावरील सेवा रस्त्यावरून येणारी वाहने एकावेळी सूस गावात प्रवेश करतात. त्यामुळे येथेही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेकजण वेडीवाकडी वाहने चालवतात. त्यामुळे वादविवाद व अपघात होतात.
वाहतूक विभागाचे पोलिस व कर्मचारी या मार्गावर असले तरीही वाहनांची संख्या व रस्त्याची वहन क्षमता पाहता ही कोंडी फोडणे त्यांनाही अवघड होते. अशातच एखादी रुग्णवाहिका कोंडीत अडकली, तर पर्यायी रस्ता नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. ही समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात प्रस्तावित असलेले रस्ते विकसित झाले, तर सर्वच बाजूंना होणाऱ्या कोंडीच्या समस्येतून प्रवाशांची कायमची सुटका होईल.
- नारायण चांदेरे, स्थानिक नागरिक
सूस रस्त्यावर पावसामुळे पडलेले खड्डे, अतिक्रमणे व अरुंद रस्ता ही मोठी समस्या असून यासंदर्भात संबंधित विभागांना माहिती कळवलेली आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- प्रसाद गोकुळे, पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग.
वाहतूक नियमांचे पालन न करता वेडीवाकडी वाहने चालविणाऱ्यांमुळेही वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिसांनी कडक भूमिका घेऊन नियम मोडून वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.
- माया जोशी, रहिवासी, सूसगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.