आदिवासी सांस्कृतिक महोत्सवामुळे पुणेकरांना कला आणि संस्कृतीचे दर्शन

महोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी नागरिकांच्या पारंपरिक वस्तू, नृत्य, खाद्यपदार्थ,कडधान्य इत्यादींचे प्रदर्शन
आदिवासी सांस्कृतिक महोत्सव
आदिवासी सांस्कृतिक महोत्सवSakal
Updated on

पुणे : आदिवासी सांस्कृतिक महोत्सवामुळे पुणेकरांना या समाजातील चाली-रीती, रूढी-परंपरा, नृत्य, कला आणि संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. शिवाय या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात आदिवासी नागरिकांच्या पारंपरिक वस्तू, नृत्य, खाद्यपदार्थ, जैविक पद्धतीचे कडधान्य व धान्य खरेदीची संधी उपलब्ध झाली असल्याचे मत सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी (ता. २३) व्यक्त केले.

राज्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने पुण्यात पाच दिवशीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घघाटन नारनवरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महिला व बालकल्याण आयुक्तालयाचे प्रभारी आयुक्त राहुल मोरे, शिक्षण उपायुक्त अश्विनी भारुड आदी उपस्थित होते.

डॉ. नारनवरे म्हणाले, ‘‘राज्यातील आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आदिवासी विभाग कार्यरत आहे. या समाजातील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध जिल्ह्यात जिल्हास्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. भविष्यात सरलच्या धर्तीवर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्यावतीने मिळून संयुक्तपणे प्रदर्शन भरविण्यात येईल.’’

राज्याच्या विविध कोपऱ्यात आदिवासी समाज विखुरलेला आहे. त्यामुळे पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत त्यांच्या रूढी, पंरपरा, नृत्य, कला व संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आयोजित केलेल्या या महोत्सवाला विशेष महत्त्व आहे. आदिवासी समाजातील नागरिकांनी तयार केलेल्या वस्तू या 'महाट्राईब्स'च्या माध्यमातून ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. यातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होत असल्याचे यावेळी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

या विभागाचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी प्रास्ताविक केले. आदिवासी नागरिकांच्या पारंपरिक वस्तू, नृत्य, खाद्यपदार्थ, जैविक पद्धतीचे कडधान्य व धान्य, कला व संस्कृतीचे संवर्धन, प्रसार-प्रचार करणे, हा या सांस्कतिक महोत्सवाच्या आयोजनामागचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनात विविध कलात्मक वस्तु, वनऔषधी, आदिवासी खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत. हे प्रदर्शन येत्या २७ मार्चपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.