परिंचे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील येथे अंत्यविधीवेळी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात वीस जण जखमी झाले आहेत. माजी उपसभापती नीलेश जगताप यांच्यासह अनेक वाटसरूंना मधमाशा चावल्या आहेत. त्यामुळे काही काळ भितीचे वातावरण पसरले होते. याबाबत ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन मधमाशांचे हे पोळे काढण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
परिंचे येथील शेतकरी रावबा सिंधू राऊत यांचे बुधवारी (ता. 9) संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. रुद्रगंगेला आलेल्या पुराने अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी वडाच्या झाडावर मधमाशांचे पोळे होते. मृतदेह अंत्यविधीसाठी ठेवल्यावर अचानक मधमाशा उठल्या आणि अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना चावायला लागल्या. त्यामुळे पळापळ सुरु झाली.
रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंना देखील या मधमाशांनी हल्ला चढवला. त्यामुळे आरडाओरडा व पळापळ सुरु झाली. त्यातून काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. माजी उपसभापती नीलेश जगताप यांच्यासह इतर दोन जणांवर मधमाशांनी हल्ला चढवला. त्यांनी ओढ्यातील पाण्यात उडी मारुन मधमाशांपासून सुटका केली. जखमींवर शासकीय व खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. मधमाशा शांत झाल्यावर अंत्यविधीची जागा बदलून अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मधमाशा चावून अनेक लोकांचे प्राण गेल्याच्या घटना आहेत. रहदारीच्या वाटेवर या वडाच्या झाडावर बसलेले मोहोळ घातक असून, दुसरी घटना घडण्याच्या आधी हे आगी मधमाशांचे पोळे काढण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामसेवक शशांक सावंत यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेची दखल घेऊन लवकर मधमाशांचे पोळे काढण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.