पुणे : लवकर सेवेत रुजू करण्याच्या बहाण्याने एमटीएस पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषणने (सीबीआय) लष्करातील दोन अधिकाऱ्यांना बुधवारी (ता. १७) अटक केली. पुण्यातील सदर्न कमांडमधील या दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार ही कारवार्इ करण्यात आल्याची माहिती सीबीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स, पुणे यांनी घेतलेल्या परीक्षेत तक्रारदाराची एमटीएस (मल्टी टास्किंग असिस्टन्स) पदावर निवड झाली होती. त्याबाबतचे कॉल लेटर त्यांना प्राप्त मिळाले होते. तक्रारदार हे ऑर्डनन्स फॅक्टरी, वर्धा येथे रुजू होणार होते. तक्रारदार यांना लवकर रुजू करण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्यांचे मूळ कॉल लेटर घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली व त्यातील ३० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर दोन्ही आरोपी उर्वरित २० हजार रुपये स्वीकारण्यासाठी आले असता सीबीआयने त्यांना ताब्यात घेऊन अटक केले. सीबीआयने आरोपींच्या घराची झडती घेतली असून प्रकरणाशी संबंधित दोषी कागदपत्रे जप्त करण्यात आली. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अभयराज आरीकर यांनी केली. सीबीआयचे विशेष न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांनी दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
यापूर्वी हवाई दलाच्या राजपत्रित अधिकाऱ्याला अटक :
बदलीचा अर्ज पुढे पाठविण्यासाठी कर्मचाऱ्याकडून चार हजार रुपयांची लाच घेताना हवाई दलाच्या राजपत्रित अधिकाऱ्याला सोमवारी (ता. १५) अटक करण्यात आली आहे. याबाबत हाऊस किपिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने तक्रार दिली होती. देहूरोड स्टेशन येथे बदली करण्यासाठी तक्रारदारांचा अर्ज पुढे पाठविण्यासाठी आरोपीने ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. आरोपीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
दोषींवर दंडात्मक कारवाईसाठी जलद तपास :
भारतीय लष्कर भ्रष्टाचाराबाबत कडक धोरण अवलंबिण्यात येत आहे. मल्टी टास्किंग असिस्टन्सच्या भरतीमध्ये संभाव्य गैरव्यवहाराबाबत दक्षिणी कमांडमधील भारतीय सैन्य आणि सीबीआय संयुक्त तपासात करत आहे. अशा गैरप्रकारांना सामोरे जाण्यासाठी लष्कराचे नियम कठोर आहेत. दोषींवर दंडात्मक कारवाई निश्चित करण्यासाठी जलद तपास करण्यात येत आहे, असे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.