कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ हद्दीत मनमाड-बंगलोर महामार्गावर शनिवारी ( ता. 26 ) सायंकाळच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने चिंकारा जातीची तीन हरीण जखमी झाले. त्यापैकी एक गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. तर दुसऱ्या एका उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिसऱ्या जखमी हरिणाला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळापासून कुरकुंभ पशुवैद्यकीय दवाखाना हकेच्या अंतरावर असतानाही केवळ पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने जखमी हरिणांना लवकर उपचार मिळू न शकल्याने मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ, जिरेगाव, पांढरेवाडी परिसरात वनक्षेत्र असल्याने चिंकारा हरीण व इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. या वनक्षेत्राच्या परिसरातूनच मनमाड - बंगलोर महामार्ग जातो. शनिवारी (ता. 26 ) सायंकाळी सहाच्या सुमारास कुरकुंभ हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या तीन चिंकारा जातीच्या हरीणांना भरधाव वेगात जाणा-या अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत एक हरीण जागीच ठार झाले. दोन हरीण गंभीर जखमी झाले. यापैकी आणखी एका हरिणाचा दौंड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिसऱ्या जखमी हरीणाला पुढील उपचारासाठी दौंडहून पुण्याला हलविण्यात आले.
जोराच्या धडकेमुळे हरणांच्या मानेला व पायांना गंभीर मार लागला होता. या अपघाताची माहिती वनविभागाला कळविण्यात आला. मात्र वनविभागाच्या अधिकारी व त्यांचे वाहन येण्यास विलंब होत असल्याने हरणांची प्रकृती चिंताजनक होत चालल्याचे कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्वरित कुरकुंभ ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. वनविभागाचे वनकर्मचारी जालिंदर झगडे यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी दोनही हरणांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दौंडला हलविले. मात्र यापैकी एका जखमी हरीणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमी हरीणाला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविले. तीनही हरीण नर जातीची असून त्यांचे वयोमान दीड ते दोन वर्षांचे आहे.
दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वनक्षेत्र आहे. त्यामध्ये हरीण, ससा, कोल्हा, लांडगे, तरस, इत्यादी वन्य व सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. अनेक ठिकाणी वनक्षेत्रातून महामार्ग जातात. या महामार्गावर वन्यप्राणी येऊ नये यासाठी काटेरी कुंपण किंवा आवश्यक उपाययोजना नसल्याने रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेने वारंवार वन्यप्राण्यांचे मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. मात्र याकडे वनविभागाकडून दुर्लक्ष होते. शासनाने वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलून वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्ते व महामार्गावर होणारे वन्यप्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी वन्यप्राणी प्रेमींकडून होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.