Hot Mix Plant : पुण्यात दोन नवे हॉट मिक्स प्लांट ; एक जागा शिंदेवाडीत, दुसऱ्या जागेचा शोध सुरू

शहराची हद्द वाढल्याने डांबरीकरणाचे काम करताना गरम डांबर मिळावे, यासाठी दोन नवीन हॉट मिक्स प्लांट उभारले जाणार आहेत. शिंदेवाडीत एक जागा महापालिकेला मिळाली आहे; तर दुसरी जागा वारजे ते सूसदरम्यान असणार आहे.
Hot Mix Plant
Hot Mix Plantsakal
Updated on

पुणे : शहराची हद्द वाढल्याने डांबरीकरणाचे काम करताना गरम डांबर मिळावे, यासाठी दोन नवीन हॉट मिक्स प्लांट उभारले जाणार आहेत. शिंदेवाडीत एक जागा महापालिकेला मिळाली आहे; तर दुसरी जागा वारजे ते सूसदरम्यान असणार आहे. या प्लांटसाठी प्रत्येकी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

पुण्यात जुन्या हद्दीत एक हजार ४०० किलोमीटर; तर समाविष्ट गावांत सुमारे ६०० किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यापैकी एक हजार ६०० किलोमीटरचे रस्ते डांबरी आहेत. सध्या येरवड्यात महापालिकेचा एकमेव हॉट मिक्स प्लांट आहे. यातून दररोज सुमारे ४५० टन खडीमिश्रित डांबर तयार केले जाते. येरवड्यातील प्लांट जुना झाल्याने तो वारंवार बंद पडल्याने शहरातील रस्त्यांची कामे खोळंबत आहेत.

शहराची हद्द ५१८ चौरस किलोमीटरची आहे. येरवड्यातून कात्रज, वारजे, सूस, शिवणे, खडकवासला, हडपसर अशा भागांत खडीमिश्रित गरम डांबर पोहोचविणे महापालिकेपुढे आव्हान आहे. डांबर थंड झाल्यास रस्त्याच्या कामाला दर्जा राहत नाही. शहराला अन्य हॉट मिक्स प्लांटची गरज असल्याने जागांचा शोध सुरू होता. तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी नवीन प्लांट उभारणीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती.

महापालिकेने प्लांटसाठी जागेचा शोध सुरू केला असून शिंदेवाडीत एका जागा निश्‍चित केली आहे; तर पुण्याच्या पश्‍चिम भागात सूस, वारजे येथे काही जागा पाहिल्या आहेत. लवकरच एक जागा निश्‍चित केली जाणार आहे.

दोन नव्या हॉट मिक्स प्लांटसाठी प्रत्येकी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्लांटच्या खर्चास अंदाज समिती व आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनीही मान्यता दिली आहे. त्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले.

येरवड्यातील हॉट मिक्स प्लांट बंद

येरवड्यातील हॉट मिक्स प्लांट बंद असल्याने खड्डे बुजविण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. कोल्ड मिक्स डांबर वापरून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, दांडेकर पूल, नवी पेठ म्हात्रे पूल, धायरी, नऱ्हे, पेठांसह सर्व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजविल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. शहरातील रस्त्यांची चाळण झाली असताना येरवड्यातील हॉट मिक्स प्लांट बंद पडला आहे. त्यामुळे खडीमिश्रित डांबर मिळणे बंद झाल्याने खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला फटका बसला आहे. पथ विभागाने गेल्या पाच महिन्यांत आठ हजार ४७२ खड्डे बुजविले आहेत; तर २५२ चेंबरची दुरुस्ती केली आहे, असे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.