बापरे, बिबट्यांनी केली पुण्यातील 'या' गावातील रस्त्याची वाहतूक बंद

बापरे, बिबट्यांनी केली पुण्यातील 'या' गावातील रस्त्याची वाहतूक बंद
Updated on

नारायणगाव : चार बिबटे व दोन बछडे यांच्या कुटुंबाने कांदळी (ता. जुन्नर) येथील उंबरकासमळा येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतात मुक्काम केला आहे. दुचाकीवरून ये जा करणाऱ्यांचा पाठलाग बिबटे करत असल्याने उंबरकासमळा ते शिंदेमळा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बिबट्यांच्या दहशतीमूळे या भागातील शेतीची कामे ठप्प झाली आहेत.

कांदळी येथील उंबरकासमळा येथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुतळ, सोमनाथ रेपाळे, जयसिंग बढे यांच्या शेतात व परिसरात मागील एक महिन्यापासून चार बिबटे व दोन बछडे यांचा मुक्काम आहे. 

मागील दोन दिवसांत थंडी वाढल्याने बिबट्याचे दोन बछडे व चार बिबटे असे कुटुंब येथील उंबरकासमळा ते शिंदेमळा रस्त्याच्या कडेला दिवसा दिसून येत आहेत. बुधवारी (ता.२७) सोमनाथ रेपाळे, मंगेश रेपाळे या दुचाकीस्वरांचा बिबट्याने पाठलाग केला.
या मुळे ग्रामस्थांनी येथील उंबरकासमळा व शिंदेमळा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला.

या बाबत संकेत बढे म्हणाले, ''कांदळी शिवारात बिबट्याच्या कुटुंबाने मुक्काम ठोकल्याने आम्हाला घरातून बाहेर पडणे बंद झाले आहे. या मुळे शेतात जाऊन जनावरांचा चारा काढता येत नाही. चारा असून दुभत्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शेतीची कामे ठप्प झाली आहेत. घरा बाहेर पडण्यासाठी चार चाकीचा वापर करावा लागत आहे. जुन्नर तालुक्याच्या मध्य बागायती भागात बिबट्यांची संख्या वाढल्याने भक्ष्याच्या शोधात रात्रीचे फिरणारे बिबटे आता दिवसाही फिरू लागले आहेत. यामुळे शेतीच्या मशागतीची कामे कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील सोळा वर्षात तालुक्यातील बिबट्यांची गणना झाली नाही. मात्र बिबट्यांचे वाढलेले हल्ले व बिबट्यांचा दिवसा वाढलेला मुक्त संचार याचा विचार करता तालुक्यातील बागायती भागात बिबट्यांची संख्या एक हजार असेल. असा अंदाज वनाधिकारी व कर्मचारी व्यक्त करत आहे.

बिबट्या समस्येचे निराकरण करण्यासाठी शासकीय पातळीवर ठोस उपाययोजना केली जात नसल्याने हा प्रश्न जटील होत चालला आहे. पिंजरा लावून बिबट्या पकडणे व अन्यत्र सोडून देणे हा एक कलमी कार्यक्रम सध्या वनविभागाचा आहे. मात्र ही केवळ मलम पट्टी असून या मुळे बिबट्यांची संख्या नियंत्रित होणार नाही.

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन आज उंबरकासमळा येथे एक पिंजरा लावला आहे. बिबट्यांची संख्या विचारात घेता पिंजरा उपलब्ध होताच अजून एक पिंजरा लावला जाईल.-अरुण देशमुख ( वनरक्षक, जुन्नर वनविभाग)

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.