खा. डॉ. अमोल कोल्हे सांगतात, 'कोरोनाविषयीची अनाठायी भीती दूर करायला हवी'

Amol-Kolhe
Amol-Kolhe
Updated on

वैयक्तिक जबाबदारी -
कोरानाचं स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याच्या संसर्गाची कारणं आणि संसर्गाची लक्षण याची अधिकृत माहिती (व्हॉट्‌स ॲप युनिव्हर्सिटीतून बाहेर येणारी नव्हे) प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. मुळात कोरोनाविषयी निर्माण झालेली अनाठायी भीती दूर केली पाहिजे. सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांप्रमाणेच कोरोना हाही एक आजार आहे. तो कुणालाही होऊ शकतो. त्याच्याकडं राजा अथवा रंक असा भेदभाव नाही. सध्यातरी आपली रोगप्रतिकारकशक्ती हा यावरचा एकमेव उपचार आहे. बरं, हा विषाणू हवेत स्वत:हून उडू शकत नाही. तुम्ही त्याच्या संपर्कात गेल्याशिवाय तुम्हाला त्याचा संसर्ग होत नाही. पण, तुम्हाला त्याचा संसर्ग झाला आणि तुमच्या रोगप्रतिकारकशक्तीनं हात टेकले की, तुमच्या शिंकण्यातून, खोकण्यातून, थुंकण्यातून तो झपाट्यानं पसरू शकतो. आपण चालू मिक्सरमध्ये हात घालून वाटण बाहेर काढत नाही, रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या वाहनासमोर जाऊन उभं राहत नाही. मग कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात स्वत:ची काळजी का घेऊ शकत नाही? ही काळजी घेण्यात काही फार मोठं शास्त्र नाही. आपण आरोग्यासाठी काही पथ्यं पाळायला हवीत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

  • आपले हात वारंवार साबण व पाण्यानं स्वच्छ धुणं. हात धुणं शक्य नसल्यास अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा वापर करणं. 
  • हातानं चेहऱ्याला वारंवार स्पर्श करण टाळणं. वरील दोन गोष्टी यासाठी गरजेच्या आहेत. कोरोनाचा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्यातून वा खोकण्यातून कुठल्यातरी पृष्ठभागावर पडू शकतो. उदा. दरवाजाचा हॅंडल, पुठ्ठ्याचा बॉक्स. तिथं काही काळासाठी विषाणू राहतो. आपल्या स्पर्श त्या जागेला झाला आणि आपण तोच हात चेहरा, नाकाला लावला तर विषाणूच्या प्रसारासाठी माध्यम मिळते. 
  • सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणं. अगदी साधा कापडी मास्क वा स्वच्छ धुतलेला रुमाल किंवा उपरणेही चालू शकतं. यामुळं आपल्याला संसर्ग झाला असेल (संसर्ग झालेल्यांपैकी ७० ते ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत.) तर इतरांचा त्यापासून बचाव होतो. अनावधानानं अशा व्यक्तीच्या संपर्कात आलो, तरी आपलं सरंक्षण होतं. मात्र, मास्क वापरताना नाक व तोंड व्यवस्थित झाकलंच पाहिजे. मास्कला वारंवार हात लावणं, गळ्यावर ठेवून वावरणं; बोलताना मास्क खाली करणं धोकादायक आहे. कारण यामुळं आपण स्वत:ला फसवतो. 
  • सोशल डिस्टन्सिंग ः सार्वजनिक, गर्दीची ठिकाणं टाळावीत. घराबाहेर असताना दोन व्यक्तींमध्ये किमान तीन फुटांचं अंतर असावं. 
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळं मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ शकतो. विशेषतः सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करताना या गोष्टीचं भान ठेवायलाच पाहिजे. 
  • आपल्यामध्ये कोरोनासदृश लक्षणं दिसून आल्यास विलंब न करता, स्वतःच्या मनानं उपचार न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॉक्‍टरांकडं जाताना आधी फोनवरून या लक्षणांची कल्पनाही दिली पाहिजे. जेणेकरून डॉक्‍टरांना संसर्ग होण्यापासून बचाव होईल. 
  • योग्य संतुलित आहार, लिंबू, आवळा, संत्रे यांचा आहारात समावेश, पुरेशी झोप याही गोष्टी आवश्‍यक आहेत. 

सामूहिक जबाबदारी -
धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक सोहळ्यांचं आयोजन पुढील काही महिने तरी टाळावं. ही काळाची गरज आहे. त्याचप्रमाणं समाजानंही हे समजून घ्यायला हवं, की कोरोना हा केवळ आजार आहे, गुन्हा नाही. समाजमनातून कोरोनाविषयीचा बागुलवुवा आणि भीती दूर करून अधिकृत आणि शास्त्रोक्त माहितीच्या प्रसारासाठी समाजातील प्रभावशाली व्यक्तिंनी पुढाकार घ्यायला पाहिजे. सामाजिक जागृतीसाठी शासनानं, प्रशासनानं कितीही आटापिटा केला, तरी त्याचा प्रभाव हा समाजाच्या स्वीकृतीवर अवलंबून आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये गर्दी कमी होण्याच्या दृष्टिनं शाळा, महाविद्यालये, खासगी कंपन्या, ऑफिसेस यांच्या वेळेतही बदल केले पाहिजेत. शक्‍य तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण राबवावं लागेल. प्रसारमाध्यमांची भूमिका हा एक स्वतंत्र लेखाचा विषय ठरू शकेल, परंतु प्रसारमाध्यमांची सकारात्मक व वस्तुनिष्ठ भूमिका फार महत्त्वाची आहे. ‘व्हॉटस्ॲप युनिर्व्हसिटी’पेक्षा अधिकृत व वस्तुनिष्ठ माहितीवर विश्‍वास ठेवण्याची समाजाला सवय लावून घ्यावी लागेल. कोरोनासह जगणं यशस्वी करायचं असल्यास जबाबदार नागरिकत्वाची भावना समाजात प्रभावीपणे रुजायला हवी.

पथ्ये पाळणे आवश्यक -

  • कोरोना राजा अथवा रंक असा भेदभाव करीत नाही. 
  • चांगल्या आरोग्यासाठी काही पथ्ये पाळणे गरजेचे.
  • कोरोनाचा संसर्ग जाणवताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. 
  • व्हॉटस्ॲप युनिर्व्हसिटी’पेक्षा अधिकृत व वस्तुनिष्ठ माहितीवर विश्‍वास ठेवा
  • कोरोनापासून बचाव ही शासन आणि प्रशासनाइतकीच प्रत्येकाचीही जबाबदारी आहे, हे ध्यानात ठेवून आपली वागणूक असावी.

कोरोनाच्या संसर्गात स्वतःची काळजी घेणे हे काही फार मोठे शास्त्र नाही. सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांप्रमाणेच कोरोना हाही एक आजार आहे. तो कोणालाही होऊ शकतो. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा यावरचा एकमेव उपचार आहे. प्रत्येकाजवळ संसर्गाची कारणे आणि लक्षणे याची अद्ययावत माहिती असल्यास अनाठायी भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. 
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

वाचकहो, तुमच्या काही शंका, सूचना असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावर व्हॉटस्अप करा.
91300 88459, editor@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()