एक सप्टेंबर २०२४ स्थळ पुण्यातील नाना पेठ वेळ रात्री ८.३० च्या दरम्यान अचानक गोळीबाराच्या आवाजांनी आसपासचा परिसर हादरला. एकामागून एक असे ५ राऊंड फायर केले गेले. या हल्ल्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असणाऱ्या वनराज आंदेकर यांची निर्घुण हत्या करण्यात आली.
सहा गाड्यांवरून आलेल्या १२- १३ जणांच्या टोळक्यानं सिनेस्टाईलनं हा हल्ला केला. सुरुवातीला गोळीबार झाला आणि नंतर कोयत्यानं सपासप वार करत वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं पुणे शहरं पुन्हा एकदा हादरलं. सुरुवातीला हे गँगवॉर प्रकरण वाटतं होतं. कारण आंदेकर टोळी ही पुण्यात गुन्हेगारीतलं चर्चेतलं नाव. पण सीसीटीव्ही सापडला, हत्येचा उलगडा झाला आणि वनराजच्या हत्येमागची धक्कादायक माहिती समोर आली.