Vasant More Resign - वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी सकाळी एक नाराजीची पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांनी दुपारी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. (vasant more resign from raj Thackeray mns party)
वसंत मोरे म्हणाले की, मी गेले २५ वर्ष सातत्याने राजकीय जीवनात काम करत आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पुण्यातील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता मी होतो ज्याने राज ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आजपर्यंत मी राज साहेबांसोबत होतो. पण, आज मी पक्षाचा आणि माझ्याकडील सर्व जबाबदाऱ्यांचा मी राजीनामा दिला आहे
गेल्या एक-दोन वर्षांपासून मी पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहे. पण, पक्षातील काही पदाधिकारी, जे आधी इच्छूक नव्हते त्यांची देखील नावे पुढे आली. राज साहेबांनी सर्व लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागितले होते. ज्यांच्यावर पुणे शहराची जबाबदारी होते. त्यांनी राजसाहेबांना पुण्याची स्थिती नाजूक असल्याची माहिती जाणूनबुजून दिली. पुण्याचा नकारात्मक अहवाल देण्यात आला होता, असं मोरे म्हणाले.
पुण्यातून लोकसभा मनसे लढू शकत नाही असं राज ठाकरेंना कळवण्यात आलं. काही लोकांनी माझ्या निष्ठेविषयी प्रश्न उपस्थित केले. काही लोकांनी मी निवडणूक लढू नये यासाठी प्रयत्न सुरु केले होते. अशा लोकांसोबत काम करण्याची मला इच्छा नव्हती. त्यामुळे मी आज सर्व परतीचे दोर कापले आहेत. पुन्हा पक्षात येण्याचा आता प्रश्नच नाही, असं मोरे म्हणाले. यावेळी ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात होता. मी राज ठाकरेंना मागच्या महिन्यात वेळ मागितली होती. पण, त्यांच्याशी बोलणं झालं नाही. माझा वाद साहेबांसोबत नाही. पण, काही चुकीच्या लोकांच्या हाती पुणे शहर गेले आहे. माझा त्रास नेत्यांना कधीच कळाला नाही. मी काल रात्रभर झोपलो नाही. आता का मला नेत्यांचे फोन येऊ लागले आहेत? इतके दिवस त्यांना दखल घ्यावी वाटली नाही का? असं ते म्हणाले.
निवडणूक लढवणे हा माझा गुन्हा आहे का? पक्ष संघटना वाढवणे चुकीचं आहे का? पण, काहींना वाटतं की मी स्वकेंद्रीत राजकारण करतो. कोर कमिटीच्या नेत्यांनी हा आरोप माझ्यावर केला आहे. कुठवर मी सहन करायचं, किती गाऱ्हाणी मी मांडायची. उलट माझ्यावर कारवाई झाली होती. त्यामुळे मी कोणत्याही पदावर न राहण्याचा निर्णय घेतलाय, असं मोरे म्हणाले.
मी कोणत्याही पक्षात गेलो नाही. पुणेकरांच्या म्हणण्यानुसार पुढील निर्णय घेणार आहे. त्यांनी म्हटलं तर मी एकटा निवडणूक लढवणार. लोकसभा निवडणुकीबाबत माझी शरद पवारांशी चर्चा झालेली नाही. माझ्याशी राजकीय पक्षांनी संपर्क केला आहे. पण, दोन ते तीन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेन, असं वसंत मोरे म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.