Chandrashekhar Bawankule : विधानसभा निवडणुकीवर होणार मंथन

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन २१ जुलैला बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal
Updated on

पुणे - भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन २१ जुलैला बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. यात विधानसभा निवडणुकीवर मंथन होणार असून मतदारयादी, बूथ यंत्रणा, राज्य व केंद्र सरकारने केलेली कामे यावर पक्षाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले.

या अधिवेशनाला राज्यभरातून पाच हजार ३०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याचे उद्‍घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होईल. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचा समारोप केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यांचा अभिनंदनाचा ठराव अधिवेशनात मांडला जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, ‘महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ आहे, हे सर्वांना मान्य आहे. कधी कधी आम्ही लहान भावाची भूमिकाही घेतो. आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल, यावर प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात चर्चा होणार नाही. तो निर्णय महायुतीचे नेते ठरवतील.

पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन महायुतीला जिंकण्यासाठी प्रयत्न करणे, हे महत्त्वाचे आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी जेवढ्या जागा जिंकणे आवश्‍यक आहे, तेवढ्या जागा आम्ही जिंकू; पण याचा आकडा जनता ठरवले. अजित पवार महायुतीमध्ये आहेत. त्यांना सर्व २८८ मतदारसंघात संघटना मजबूत करण्याचा पूर्ण अधिकार आहे.’

जनता ठरवेल किती जागा मिळणार !

लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पार जागांचा दावा करत भाजपने आक्रमक प्रचार केला होता; पण प्रत्यक्षात २४० जागाच देशभरात मिळाल्या. आता विधानसभा निवडणुकीला भाजपने सावध भूमिका घेत, आगामी निवडणुकीत किती जागा जिंकणार? याचा आकडा जाहीर करण्यास बावनकुळे यांनी टाळले. ‘महायुतीमध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत. आम्हाला किती जागा मिळणार? याचा आकडा जनता ठरवेल; तर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल, हे पक्षाचे नेते ठरवतील,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.

ऑगस्टमध्ये संवाद यात्रा

महाविकास आघाडीचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी भाजपतर्फे राज्यात नऊ ते १५ ऑगस्टदरम्यान संवाद यात्रा काढली जाणार आहे. यामध्ये २० राज्यांमधील नेते २८८ विधानसभा मतदारसंघांत जाऊन मतदारांशी संवाद साधणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास संविधान बदल, आदिवासींचे हक्क नाकारणार असा खोटा प्रचार करून मतदारांना संभ्रमात टाकले. हा खोटारडेपणा जनतेला सांगू. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारच्या आठ योजना बंद केल्या होत्या. त्यामुळे केंद्र व राज्यात एक सरकार असावे, हे मतदारांपुढे मांडू, असे बावनकुळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.