९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून म्हणजेच 3 डिसेंबरपासून नाशिकमध्ये सुरु होत आहे. ४ डिसेंबरपर्यंत ते असणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ते पुढे ढकलण्यात आलं होतं. यावर्षी नाशिक शहरातील आडगावच्या कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटीमध्ये साहित्यिकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील. तर, यंदा अध्यक्षपदाचा मान जयंत नारळीकरांना दिला आहे.
मराठी साहित्य संमेलन आणि वाद-विवाद यांचं जवळचं नातं राहिलं आहे. दरवर्षी साहित्य संमेलन कोणत्यातरी वादात सापडतं. यंदा काँट्रोव्हर्सी झालीये ती म्हणजे वाङमय चोरीच्या आरोपामुळे! कारण नाशिकस्थित एका ट्रॅव्हल ब्लॉगरने त्याचे व्हिडीओ न विचारता वापरल्याचा आरोप संमेलनाच्या आयोजकांवर केला आहे. मराठी साहित्य संमेलनाचं अधिकृत गीत २० नोव्हेंबरला संजय गीते यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर प्रसारित केलं. ते स्वत: या गाण्याचे गीतकार आहेत. 'अनंत आमुची ध्येयासक्ती...' नावाने हे गाणं सध्या सोशल मीडियामार्फत साहित्य रसिकांमध्ये पोहोचत आहे.
मात्र, या गाण्यात वापरण्यात आलेले व्हिज्युअल्स एका पर्सनल ब्लॉगरच्या युट्युब चॅनेलवरून उचलण्यात आले आहेत. यामध्ये कसारा घाट, वैतरणा धरणाचा विसर्ग, सिन्नरच्या विंडमिल्स, कश्यपी डॅम, इगतपुरीचा घाट,इ. ठिकाणांचे ड्रोन शॉट्स चोरण्यात आल्याचा आरोप ब्लॉगर सुशील अहिरे आणि किंजल दमानी यांनी केला आहे. ते 'वाँडरिंग माइंड्स' नावाने प्रवास, पर्यटन, खाद्यपदार्थ आणि लाईफस्टाईल संदर्भात युट्युब चॅनेल चालवतात. 'सकाळ'च्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी हे व्हिडीओ वर्षभरापूर्वी नाशिकचं पर्यटन आणि निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा दाखवण्यासाठी प्रसिद्ध केल्याचं सांगितलं. त्यांच्या या व्हिडीओतील काही व्हिज्युअल्स अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अधिकृत व्हिडीओमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
'सकाळ'चा फॅक्ट चेक
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य गीतावरच वाङमयचौर्याचा आरोप झाल्यानंतर 'सकाळ'ने याचा फॅक्ट चेक केला. संजय गीते यांनी 20 नोव्हेंबर 2021 रोजी साहित्य संमेलनाच्या 'थीम साँग'चा व्हिडीओ त्यांच्या युट्युब पेजवर अपलोड केल्याचं दाखवतंय. Sanjay Gite Source Music Hub अशा नावाने त्यांचं युट्युब चॅनेल आहे. तर, मूळ मालकीचा दावा करणारे सुशील अहिरे यांच्या युट्युब पेजवर हा व्हिडीओ वर्षभरापूर्वी अपलोड करण्यात आलाय.
Heaven on Earth Near Mumbai - Nashik Aerial View नावाच्या व्हिडीओ त्यांच्या युट्युब चॅनेलवर 20 सप्टेंबर 2020 ला प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओवर 'वाँडरिंग माइंड्सचा लोगो आणि वॉटरमार्क आहेत. मात्र, साहित्य संमेलनाच्या व्हिडीओमध्ये काही ठिकाणी हा लोगो काढून टाकण्यात आल्याचं दिसतं. तर, अनेक व्हिज्युअल्समध्ये मूळ संहितेच्या मालकाने वापरलेला वॉटरमार्क फेड केल्याचं दिसतंय.
त्यामुळे साहित्य संमेलनाचा व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्ती वाङमयचौर्याच्या आरोपाबद्दल काय बाजू मांडणार हे पाहाण महत्वाचं आहे.
नक्की प्रकरण काय?
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या थिम साँगचा व्हिडीओ प्रसारित झाला आहे. यामध्ये नाशिक शहरासंदर्भात वापरण्यात आलेले व्हिडीओ एका अन्य युट्युब चॅनेलवरून थेट उचलण्यात आले आहेत. काही व्हिडीओशी छेडछाड केल्याचा आरोप मूळ मालकांनी केला आहे. तसेच कोणतंही सौजन्य न देता, कोणत्याही प्रकारे अधिकृत परवानगी न घेता हे व्हिडीओ वापरण्यात आल्याचा आरोप ''वाँडरिंग माइंड्स'चे सुशील अहिरे यांनी केला आहे. यासोबतच व्हिडीओत वापरण्यात आलेला लोगो त्यांच्या युट्युब चॅनेलचा असल्याचं त्यांनी सांगितलं. हे व्हिज्युअल्स मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.