आळंदी : आषाढी वारीसाठी शासनाने पायी वारीसाठी पंढरपूर तालुक्यातील वाखरी ते ईसबावी येथील विसावा मंदिरपर्यंतचे तीन किमी अंतर सर्व मानाच्या पालख्यांना चाळीस वारकऱ्यां परवानगी दिली आहे. ईसबावी येथील विसावा मंदिरापासून पुढे पंढरपूरापर्यंत साडे तीन किमीचे अंतर सर्व पालखी सोहळ्याचे एकत्रीत मिळून केवळ 20 वारकरी पायी जातील. ही परवानगी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मुदत व पूनर्वसन विभागाने दिली असून तसा आदेश कक्ष अधिकारी हितेंद्र फुफारे यांनी दिला. मात्र सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे. (Warkari participating in the Alandi Palkhi Wari ceremony need RT PCR test)
शासनाने ठरवून दिलेल्या संख्येनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत जेष्ठ वद्य सप्तमीला गुरूवारी (ता.१) देहू येथून जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान पैठण येथून होईल. आळंदीतून जेष्ठ वद्य अष्टमीला शुक्रवारी (ता.२) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीकडे प्रस्थान होईल. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई आणि माता रूक्मीणी मातेच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यापूर्वीच झाले. आता सर्व पालख्या प्रस्थाननंतर गावातच राहतील आणि आषाढ शुद्ध दशमीला १९ जुलैला पंढरपूरला एसटीने आषाढी एकादशीसाठी मार्गस्थ होवून वाखरी येथे पोचतील.
वाखरीत गेल्यानंतर मात्र मानाच्या पालख्यांना परंपरेनुसार चालण्याची परवानगीसाठी सर्व देवस्थान आग्रही होते. त्याप्रमाणे मागणीला यश आले. यामुळे आता शासनाच्या निर्देशानुसार आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शंभर वारकऱ्यांव्यतिरिक्त साडे तीनशे वारकऱ्यांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे. देहू येथे जगतगूरू संत तुकाराम महाराज प्रस्थान सोहळ्यामध्ये शंभर वारकऱयांव्यतीरिक्त अडीचशे वारकऱ्यांना दर्शनासाठी शासनाने परवानगी दिली.
मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारीचे स्वरूपही शासनाने ठरवून दिले. यामध्ये पंढरपूर तालु्क्यात शेवटच्या टप्प्यातील वाखरी येथे सर्व मानाच्या पालख्या मागील वर्षीप्रमाणे एकत्र जमतील. तेथून पुढे वाखरी ते इसबावी येथील विसावा मंदिर हा 3 किलोमीटरचा टप्पा प्रत्येक देवस्थानांच्या 40 वारकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात पायी चालतील. विसावा मंदिर ते पंढरपूर शहरात प्रवेश करताना साडे तीन किलोमीटरचे अंतर सर्व पालखी सोहळ्यातील एकत्रीत वीस वारकऱ्यांना पायी जाण्यास परवानगी देण्यात आली. आषाढी वारीसाठी वाखरी येथे आलेल्या सर्व मानाच्या दहा पालखी सोहळ्यातील उर्वरित सहभागी 380 वारकरी इसबावीपासून थेठ वाहनाने पंढरपूरात विसाव्यासाठी पोचतील. पंढरपूरात जाताना मात्र सर्वांनी मानाच्या क्रमाने आणि सामाजिक अंतर ठेवूनच मार्गक्रमण करावयाचे आहे.
पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे यांनी सांगितले की, ''कोरोनाचे सावट वारीवर नक्की आहे. शासनाच्या निर्देशाचे पालन करत सोहळा पार पडेल. यासाठी बहूतांश दिंडीवाल्यांनी मान्यता दिली. आळंदीत दिंड्यांचे प्रतिनिधी आले आहेत. देहू आणि आळंदी संस्थानने प्रस्थानसाठी आलेल्या वारकऱ्यांचे आरटीपीसीआर चाचणीही केली. संपूर्ण सोहळा पायी जाणार नसला तरी केवळ वाखरीपासून पायी जाण्यास परवानगी मिळावी यासाठी देवस्थानांचे प्रतिनिधी शासनाबरोबर सातत्याने संवाद ठेवून होते. अखेर त्यांना यश मिळाले.''
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.