Pune Monsoon : पुणेकर पाण्यात; महापालिकेची सुट्टी!

अवघ्या तीन तासांच्या पावसाने शनिवारी ठिकठिकाणी पाणी साठून पुणेकरांची दैना उडाली. चव्हाणनगर, धानोरी, कळस, विश्रांतवाडी अशा अनेक भागांत घरे, दुकाने, सोसायट्यांमध्ये पाणी गेले.
Pune Monsoon
Pune Monsoonsakal
Updated on

पुणे : अवघ्या तीन तासांच्या पावसाने शनिवारी ठिकठिकाणी पाणी साठून पुणेकरांची दैना उडाली. चव्हाणनगर, धानोरी, कळस, विश्रांतवाडी अशा अनेक भागांत घरे, दुकाने, सोसायट्यांमध्ये पाणी गेले. अनेक ठिकाणी वाहनांबरोबर माणसे पाण्यातून मार्ग काढताना जीव धोक्यात घालत होती. रस्त्यांच्या नद्या झाल्या. अतिक्रमणामुळे जे काही उरले आहेत ते ओढे-नाले भरून वाहू लागले. अनेक ठिकाणी असंख्य माणसे जागीच अडकून पडली. पण कुठेही ना महापालिकेचे अधिकारी होते ना कर्मचारी, कारण ते सुट्टीवर होते...

चार दिवसांपूर्वीच पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तेव्हाच महापालिकेच्या प्रशासनाच्या कामातील त्रुटी उघड झाल्या होत्या. आज त्याचे गांभीर्य आणखी तीव्र झाले. रस्तेच पाण्यात बुडाल्याने जनजीवन ठप्प झाले. अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पाहणी दौऱ्यांच्या सोपस्कारानंतरही महापालिका प्रशासनाला जाग आली नसल्याचेच सिद्ध झाले. काही अपवाद वगळता रस्त्यावरील पाणी काढणे, अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढणे, घरे, सोसायट्यांमधील पाणी बाहेर काढणे अशा कोणत्याही कामासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा दिसत नव्हती.

सायंकाळी साडेचार-पाच वाजता पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर अचानक वाढला आणि केवळ २० ते ३० मिनिटांतच रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. शहरातील बहुतांश मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मध्यवर्ती भागांतील पेठा, उपनगरांमधील गावठाण, वाडे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. अनेक भागांत कमरेइतक्‍या पाण्यातून जीव मुठीत घेऊन नागरिक घरी जाण्यासाठी धडपडत होते. नोकरी, व्यवसायाची वेळ संपल्यानंतर दुचाकी, रिक्षा, मोटार यांच्यातून घरी निघालेले पुणेकर वाहतूक कोंडीत अडकले. बसमधील प्रवाशांवर तर अक्षरशः रडण्याची वेळ आली.

मी अडकलेय, मला सोडव!

माझी गाडी पावसाच्या पाण्यात अडकून पडली आहे. गाडीवरून पाणी वाहतेय. मी अडकलेय, मला सोडव रे... अंकिताचे शब्द ऐकून तिचा मित्र विशाल पुरता हादरला. दोन किलोमीटर अंतरावर नरवीर तानाजी वाडी परिसरात असलेल्या मैत्रिणीच्या मदतीसाठी तत्काळ धावला. काही वेळातच तिथे पोहोचून त्याने तिला धीर दिला. नागरिकांनी तिची गाडी तोपर्यंत बाजूला घेतली होती. अंकिताला घेऊन विशाल व त्याचा मित्र तिच्या घराच्या दिशेने निघाले. ...असे प्रसंग शनिवारी अनेकांवर ओढवले.

इशारा असूनही...

शनिवारी पुण्यात जोरदार पाऊस होणार, असा हवामान खात्याने इशारा दिला होता. त्याचीही दखल महापालिका प्रशासनाला घ्यावीशी वाटली नाही, याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.