पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावां-गावातील पिण्याच्या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी आता महिलांकडे सोपविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येकी पाच महिलांना पिण्याचे पाणी नमुना संकलन व पाण्याचे जैविक तपासणीबाबतचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येत आहे. येत्या १३ जानेवारीला महिलांच्यावतीने ही पाणी तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
या खास प्रशिक्षणासाठी केंद्र पुरस्कृत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील १ हजार ८७४ गावांमधील मिळून एकूण ९ हजार ३७० महिलांची निवड करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत तीन महिने कालावधीची पाणी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.
यासाठी सर्व ग्रामपंचायतींना पाण्याचे जैविक फिल्ड टेस्ट किट पुरविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्वच गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांची पाणी गुणवत्ता तपासणी अभियान स्वरूपात एकाच दिवशी पूर्ण केली जाणार आहे. पाण्याची शास्त्रोक्त पद्धतीने गुणवत्ता तपासणी कशी करावी, याचे प्रशिक्षण तालुकास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सुरु केले आहे.
प्रसाद म्हणाले, ‘‘येत्या ११ जानेवारीला तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील प्रत्येकी दोन जलसुरक्षकांना जैविक फील्ड टेस्ट किट प्रशिक्षकांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे प्रशिक्षित जलसुरक्षक त्यांच्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य निरीक्षक यांच्या समन्वयाने व सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत निवड केलेल्या महिलांना १२ जानेवारीला प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रशिक्षण देणार आहेत. या तपासणी मोहिमेत दूषित पाणी स्त्रोतांची माहिती व व त्यावर करावयाच्या उपाययोजना ग्रामस्तरावरील पाणी व स्वच्छता समितीच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.