Water Tanker Lobby : टँकर लॉबीकडे पैशाचा पूर! पुणेकरांचा घसा कोरडा

एकीकडे उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिक हैराण आहेत, तर दुसऱ्या बाजूला अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत.
water tanker
Water Tankersakal
Updated on

पुणे - एकीकडे उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिक हैराण आहेत, तर दुसऱ्या बाजूला अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. महापालिकेचा टँकर मागविला तरी पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव हजार-बाराशे रुपये खर्च करून खासगी टँकर मागवावा लागत आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागांसह उपनगरांमधील नागरिक हैराण झाले आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदा महापालिकेच्या टँकरच्या फेऱ्या आठ हजारांनी वाढल्याने पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट होत आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे अडीच टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्‍यक आहे. पाटबंधारे विभाग, महापालिकेची संयुक्त बैठक झाली, पत्रव्यवहारांमध्येही पाणी बचतीसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाण्यावरून आरडाओरड होऊ नये, यासाठी पाणी कपातीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, असमान पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

1) या भागात कमी दाबाने पाणी

बाणेर, बालेवाडी, धायरी, आंबेगाव, नऱ्हे, किरकटवाडी, कात्रज, बिबवेवाडी, महंमदवाडी, एनआयबीएम, उंड्री, पिसोळी, मांगडेवाडी, येरवडा, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, पाषाण, औंध, बोपोडी, वडगाव शेरी, टिंगरेनगर, डेक्कन जिमखाना, कोंढवा गोखलेनगर आदी भागांत पाणीटंचाई भासत आहे. कमी वेळ, कमी दाबाने पाणी येण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर एक-दोन दिवस पाणी व्यवस्थित येते. मात्र, पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

2) महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा

समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने टँकर पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फुरसुंगी, उरुळी देवाची, बावधन, सूस, आंबेगाव, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी आदी भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हा पाणीपुरवठा अपुरा आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पुन्हा खासगी टँकर मागवून तहान भागवावी लागत आहे.

महापालिकेकडून जागोजागी ठेवण्यात आलेल्या बॅरलमध्ये टँकरद्वारे पाणी टाकण्यात येते. पण कमी पाणी टाकले जात असल्याने पाणी पुरत नाही. पाणी घेण्यासाठी गर्दी होते, त्यातून वाद होत आहेत. त्यामुळे आम्हाला आता पदरमोड करून खासगी टँकर मागवावे लागत आहेत. लोकसंख्येचा विचार करून महापालिकेने टँकरची संख्या वाढवली पाहिजे.

- शीतल गदळे, गृहिणी, गुजर निंबाळकरवाडी.

पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी

  • शहरात मीटर बदलल्यानंतर कमी दाबाने पाणी येते

  • पाणीपुरवठ्याची वेळ कमी झाली

  • पाण्याच्या टाक्या बांधून तयार असल्या तरी त्याचा नागरिकांना उपयोग नाही

  • टँकर माफियांसाठीच योजनेचे काम अर्धवट ठेवले

  • महापालिकेचा टँकर मागविल्यानंतर लगेच मिळत नाही, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो.

जुन्या हद्दीत समान पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. या योजनेचे काम पूर्णत्वास जात असून त्यानंतर पाण्याचे प्रश्‍न कमी होतील. समाविष्ट गावांमध्ये सूस, म्हाळुंगे, पाषाण आणि सासवड रोड येथे नवीन टँकर पॉइंट चालू करत आहोत. त्यामुळे टँकरच्या प्रवासाचा खर्च कमी होईल आणि खेपा वाढणार असल्याने जास्त पाणी मिळेल. मांजरी शेवाळवाडीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होत आहे. तेथील काम पूर्ण झाल्यानंतर त्या भागातील टँकर कमी होतील आणि हे टँकर ज्या भागात पाणीटंचाई तीव्र असलेल्या ठिकाणी फिरवले जातील.

- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

तुमच्या भागात पाण्याची परिस्थिती काय आहे? याविषयीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.