पुणे : ‘‘जोपर्यंत सरकार आणि समाज एकत्र येत नाही, तोपर्यंत कोणतेही सरकार आले तरी नदी पुनरुज्जीवन यशस्वी होऊ शकणार नाही. समाज सरकारपेक्षा शंभर पट काम करू शकतो. मात्र आर्थिक नेते बनण्याच्या नादात आपण पर्यावरणाच्या हानीमुळे भविष्यात आपले आरोग्य कसे असेल हे विसरत आहोत,’’ अशी खंत जलपुरुष व रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.
‘वनराई’ आणि ‘जल बिरादरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘नदी की पाठशाला’ या अभ्यासक्रमाचा उद्घाटन समारंभ सोमवारी (ता.२८) पार पडला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. सिंह बोलत होते. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठा’चे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम, संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, ‘फर्ग्युसन महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, सचिव अमित वाडेकर आणि सुमंत पांडे यावेळी उपस्थित होते. (We are forgetting health in the name of becoming an economic leader said Dr. Rajendra Singh)
डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘प्रत्येक महाविद्यालयाने राम नदीसारख्या छोट्या नद्यांची जबाबदारी स्वीकारली तर पुढील पाच ते दहा वर्षांत नद्यांचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. या उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सातत्यपूर्ण आणि सक्रिय सहभाग राहणार आहे.
धारिया म्हणाले, ‘‘नद्यांचे पुनर्वसन करायचे असेल तर ड्रेनेज लाइनवर देखील काम केले पाहिजे. ओढे नाले १२ महिने वाहत होते तेव्हा गावात कधीही पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत नव्हती. नुसते पाण्याचे जतन न करता नद्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्रोतापासून सुधारणा झाली तर त्याचा उपयोग होईल.’’ डॉ. परदेशी, एस. चोक्कलिंगम, कलशेट्टी आणि डॉ. मासाळकर यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमापूर्वी पर्यावरण शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक पथनाट्य सादर केले. तर पर्यावरणासाठी काम करीत असलेल्या गिरीश पाटील, प्रणाली चिकटे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सुमंत पांडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अक्षदा देशपांडे यांनी केले. अमित वाडेकर यांनी आभार मानले.
केवळ तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमुळे विकास होणार नाही :
‘‘देशातील बड्या नद्या सध्या मैलापाणी वाहण्याचे काम करीत आहे. त्यांच्या स्थितीत बदल करण्यासाठी आपल्या आचरणात आणि दृष्टिकोनात बदल करावा लागेल. नदीच्या सुधारणेसाठी तिच्या उगमापासून विविध टप्पे समजावून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर नदी प्रदूषित होणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नदीच्या जीवनाला आपल्या जीवनाबरोबर जोडून ती आरोग्यसंपन्न केली पाहिजे. केवळ तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमुळे विकास होणार नाही. आपण आपल्या वागण्यातून निसर्ग वाचविला पाहिजे. त्यासाठी भावी पिढीने जल साक्षरतेची जबाबदारी घेतली पाहिजे,’’ असे डॉ. सिंह म्हणाले.
फर्ग्युसन महाविद्यालय - वनराई आणि जल बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नदी की पाठशाला या अभ्यासक्रमाचे उद्घाटन डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.