पुणे - कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असलेल्या विविध प्रकारच्या दहा लाख ५८ हजारांहून अधिक कामगारांना प्रत्येकी साडेसहा हजार रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. मदत स्वरूपात ६७४ कोटी ९२ लाख २५ हजार रुपये कामगारांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
लॉकडाउन आणि कडक निर्बंधांमुळे राज्यात अनेक मजुरांनी त्यांचा रोजगार गमावला होता. त्यामुळे मंडळात नोंदणी असलेल्या विविध प्रकारच्या कामगारांना प्रत्येकी साडेसहा हजार मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सुरुवातीला दोन हजार त्यानंतर ३००० व शेवटच्या टप्प्यात दीड हजार रुपयांचे वाटप मंडळाकडून करण्यात आले. सरासरी साडेदहा लाख कामगारांना या तीनही रकमेचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे अनलॉक होण्यापूर्वी व त्यानंतरही या रकमेचा हातभार लागल्याने अनेक कामगारांना दिलासा मिळाला आहे.
रोजगार गमावलेल्या मजुरांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये मदत जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी १८ एप्रिल २०२० रोजी घेतला होता. त्यानुसार २१ एप्रिलपासून वाटप सुरू झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात तीन हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्प्यात १० लाख पाच हजार ३१ कामगारांना २०१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात नऊ लाख ९० हजार २५७ कामगारांना २९७ कोटी तर तिसऱ्या ११ लाख ७८ हजार ९२८ कामगारांना १७६ कोटी रुपये देण्यात आले आहे.
आत्तापर्यंत सुमारे साडेदहा लाख कामगारांना तीनही मदतीचे वाटप करण्यात आले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आत्तापर्यंत ६७४ कोटी रुपयांची आर्थिक मदत कामगारांच्या खात्यावर जमा झाली आहे. नोंदणीसाठी काही अर्ज प्रलंबित असून त्यांची छाननी झाल्यानंतर त्यांनादेखील मदत दिली जाणार आहे.
- एस. सी. श्रीरंगम, सचिव, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
तांत्रिक अडचण दूर करू
बँक खात्याची किंवा चुकीची माहिती पुरवणे, अर्ज भरताना त्यात त्रुटी असणे अशा विविध कारणांमुळे अनेक कामगारांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. त्यांच्या अर्जाची पुनर्तपासणी करून व अर्ज दुरुस्त करून घेत मदत न मिळालेल्या कामगारांनाही रक्कम देण्यात येत आहे. संबंधितांचे अर्ज दुरुस्त करून घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील कामगार विभागाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.
कोरोना सुरू झाल्यापासून अनेक दिवसांचा रोजगार बुडाला आहे. हातावर पोट असल्याने या काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे मंडळाने दिलेली ही आर्थिक मदत मोलाची ठरली. आम्हाला कायमस्वरूपी आर्थिक सक्षम करण्यासाठी मंडळाने प्रयत्न करायला हवेत. तसेच, ज्या लोकांना मदत मिळालेली नाही त्यांनादेखील ती लवकर मिळण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायला हवेत.
- धर्मेश रामटेके, बांधकाम मजूर
१८,७५,५१० - नोंदणीकृत मजूर
११,९२,४७४ - नोंदणीकृत सक्रिय मजूर
६५०० (प्रत्येकी) - मदत म्हणून वाटप झालेली रक्कम
२०,२८,९०३ - मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले मजूर
६,७६,०५० - ऑनलाइन नोंदणी झालेल्या कामगारांची संख्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.