राज ठाकरे आजपासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी मुख्यत: जात, आरक्षण, देशाचा विकास आणि गेली ७४ वर्षातील भारत यावर आपली मते व्यक्त केली आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमधील वक्तव्यानंतर काही टीका त्यांच्यावर करण्यात आल्या होत्या. त्याबद्दलचा खुलासा त्यांनी केला आहे. त्यांच्या या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...
शरद पवारांना दिलं सडेतोड उत्तर
मी प्रबोधनकारांची पुस्तकं आणि यशवंतराव चव्हाण पण वाचलेत. मी जे बोललोय त्याच्याशी आजोबांचं काय संबंध? असं राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय. १९९९ सालानंतर जातीपातींमधला द्वेष वाढला, असं वक्तव्य मी केलं होतं. या सगळ्याबाबत राज ठाकरेंनी प्रबोधनकार वाचावेत, असं त्यांनी म्हणण्याचा अर्थच मला कळला नाहीये.
मराठ्यांना आरक्षण देणार नसाल तर सरळ सांगा
जातीपातीच्या मुद्द्यातून महाराष्ट्राने बाहेर येणं गरजेचं आहे. गेल्या १५-२० वर्षांपासून मित्रांमध्ये, शाळा-कॉलेजेसमध्येही जातीपातीचे विचार आले. पत्रकारांमध्येही हल्ली जात डोकावत आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, त्या महाराष्ट्राची अशी अवस्था चिंताजनक आहे. मराठा बंधू-भगिनींनी मोर्चे काढले, आंदोलने केली. पण हे मोर्चे कशातून निघाले? कले निघाले? जर त्यांना आरक्षण मिळणार नसेल तर त्यांना तसं स्पष्ट सांगा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांची माथी भडकवून केवळ या निवडणुकीला मत मिळतील. पण पुढे परिस्थिती गंभीर आहे", अशी रोखठोक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या उदयानंतरच जातीचं राजकारण वाढलं
राज ठाकरेंनी मागे केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. १९९९ सालानंतर जातीपातींमधला द्वेष वाढला, या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात जातीय द्वेष हा राष्ट्रवादीच्या उदयानंतर वाढला आहे. दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष राष्ट्रवादीच्या जन्मानंतर वाढला, हे सगळ्यांनाच माहितीय, असंही त्यांनी म्हटलंय.
प्रबोधनकार तुम्हालाही परवडणार नाहीत
ते म्हणाले की, मी काय वाचतो आणि मी काय वाचलंय, हे माझं मला, माझ्या पक्षाला आणि लोकांना माहितीय. मला मोजायचा प्रयत्न करु नये. मी आजोबांचं सगळं वाचलंय. त्यांचे काही संदर्भ हे त्या त्या काळातले आहेत. मला वाटतंय प्रबोधनाकारंच आवश्यक तेवढंच घ्यायचं आणि बाकी टाळायचं असंही करुन चालणार नाही. पहिली गोष्ट प्रबोधनकार ठाकरे तुम्हालाही परवडणार नाहीत. प्रबोधनकारांना मध्ये आणयाचंच असेल तर तुम्हालाही ते परवडणारे नाहीत.
जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडावं
ते म्हणाले की, मी दिलेल्या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये मी गेल्या ७४ वर्षांत काय गमावलं काय कमावलं याचा उहापोह केला आहे. गेल्या ७४ वर्षांत आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का हा प्रश्न आहे. आपण किती वर्षे त्याच त्याच मुद्यांवर राजकारण करणार आहोत? बाबासाहेब पुरंदरेकडे मी ब्राह्मण म्हणून जात नाही तर इतिहास संशोधक म्हणून जातो. पवारांच्या भेटीला जाताना मराठा म्हणून जात नाही. महाराष्ट्र जागा व्हावा आणि पुन्हा पुन्हा त्याच जातीच्या चिखलात राजकारण व्हावं, असं मला वाटत नाही. त्यातून बाहेर पडावं, असं मला वाटतं.
निवडणुकीत फक्त 'हे' आरक्षण असावं
निवडणुकीमध्ये वार्डनिहाय जातीचं आरक्षण असू नये. त्यापेक्षा फक्त स्त्री आणि पुरुष यावरच आरक्षण असावं, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांसाठी तुम्ही विरोधाची भुमिका घ्याल का? याबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं की, हे आम्ही काय ठरवणार, जे वरुन ठरतंय तसंच होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.