Pune Vehicles Speed : पुण्यातील वाहनांचा प्रतितास वेग किती? याची अद्ययावत माहिती पर्यावरण विभागाकडे नाही

पुणे शहरातील वाहनांची संख्या गेल्यावर्षी अडीच लाखाने तर चार वर्षात तब्बल ८ लाखाने वाढली आहे.
Vehicles Speed
Vehicles Speedsakal
Updated on

पुणे - शहरातील वाहनांची संख्या गेल्यावर्षी अडीच लाखाने तर चार वर्षात तब्बल ८ लाखाने वाढली आहे. बहुतांश रस्त्यावर वाहतूक कोंडी असते तरीही शहरात एका तासाच्या प्रवासासाठी किती वेळ लागतो त्याची अद्ययावत माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे नाही.

२०१८ मध्ये सर्वंकष वाहतूक आराखड्यात गर्दीच्या वेळेतील सरासरी गती १८ किलोमीटर असल्याचे नमूद केले होते. हीच माहिती २०२३ च्या पर्यावरण अहवालात समाविष्ट केली आहे. त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीचा प्रतितास वेग नेमका किती असा प्रश्‍न उपस्थित होतो.

पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने २०२२-२३ चा पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल मुख्यसभेला सादर केला आहे. त्यामध्ये शहरातील वाढती वाहनांची संख्या, त्यामुळे वाढणारे प्रदूषण, महापालिकेकडून सुरू असलेले प्रयत्न याचा ऊहापोह करण्यात आला आहे.

वाहतूक कोंडी ही पुण्याची प्रमुख समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी मेट्रोचे विस्तारीकरण, मिसिंग लिंक जोडणे, पीएमपीचे सक्षमिकरण, रिंगरोड, उड्डाणपूल, भुयारी मार्ग करणे अशा विविध पर्यायांवर चर्चा केली जाते. पण निर्णय प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामाची गती ही अतिशय संथ असल्याने शहराची वाहतुकीची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

पुण्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बराच वेळ लागत आहे. २०१८ मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला. त्यामध्ये गर्दीच्या वेळी वाहनांची गती सरासरी १८ किलोमीटर इतकी असल्याचे नमूद केले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर १९ टक्के आणि खासगी दुचाकी व चार चाकीचा वापर तब्बल ८३ टक्के नागरिक करतात असे त्यामध्ये नमूद केले आहे. दर पाच वर्षांनी हा आराखडा तयार केला जातो. त्यामुळे ही आकडेवारी २०२३ मध्ये अद्ययावत होणार आहे.

पुणे महापालिकेला दरवर्षी पर्यावरणाची सद्यःस्थिती सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे जुलै महिन्यात अहवाल सादर केला जातो. महापालिकेच्या या अहवालात पुण्याच्या वाहतुकीबद्दल भाष्य करताना २०१८ मधील माहिती नमूद केल्याने नेमका शहराच्या वाहतुकीचा वेग किती त्याची वस्तुस्‍थिती समोर येत नाही.

त्याचप्रमाणे शहरात २०१९ ते २०२२ या चार वर्षामध्ये तब्बल ८ लाख १४ हजार २०४ वाहनांची संख्या वाढली आहे. असे असताना वाहनांचा गर्दीच्या वेळेत वेग हा प्रतितास १८ किलोमीटर इतकाच दाखविण्यात आला आहे. महापालिकेकडून शहराचा वेग मोजण्याचा प्रयत्न न केल्याने ही वस्तुस्थिती समोर आलेली नाही.

‘महापालिकेच्या पर्यावरण अहवालात गर्दीच्या वेळी वाहनाचा सरासरी वेग १८ किलोमीटर असल्याचे २०१८ च्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात नमूद केलेले आहे. त्यामळे पर्यावरण अहवालातही हाच आकडा आहे. महापालिकेकडून याचा अभ्यास केलेला नाही.’

- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका

टॉमटॉमच्या अहवालात ४० मिनीटे

टॉमटॉम या संकेतस्थळावर पुण्यात १०किलोमीटरच्या प्रवासासाठी सरासरी २७ मिनीटे ३० सेकंद इतका वेळ लागतो. वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात सहावा क्रमांक लागतो. टॉमटॉमच्या अहवालानुसार आज (ता. २७) सायंकाळी ७.३० वाजता शहरात २०७ ठिकाणी वाहतूक कोंडी होती व प्रति दहा किलोमीटरसाठी तब्बल ३९ मिनीट ४३ मिनीटे लागत असल्याचे नमूद केले आहे.

अशी वाढली शहरातील वाहनांची संख्या

वर्ष - वाहनांची संख्या

२०१९ - २,३९,६६०

२०२० - १,४९,२३५

२०२१ - १,६९,५५२

२०२२ - २, ५५,७५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.