पुणे : राज्य शासनाने कोरोनाच्या (Corona)पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जलतरण तलाव(Swimming pool) बंद केल्याने या तलाव चालक व जलतरणपटूंमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. तलावाच्या पाण्यातून कोरोना पसरतो हे कुठेही सिद्ध झाले नसतानाही केवळ जलतरण तलावच बंद का, असा सवाल विचारला जात आहे. तलाव बंद (Swimming pool closed)असल्याने तलाव चालक, जीवरक्षक यांच्यावरही विपरित मानसिक परिणाम होत आहेत. कालच पुण्यातल्या एका जीवरक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत १४ मार्च २०२१ रोजी तलाव बंद झाले. ते थेट नोव्हेंबरमध्ये स्पर्धात्मक सरावासाठी सुरु करण्यात आले. त्यानंतर जवळपास महिन्यानंतर दुसऱ्या लाटेत तलाव पुन्हा बंद झाले. ते मार्चमध्ये पुन्हा बंद करण्यात आले. ते जून महिन्यात सुरु करण्यात आले. पण नंतर लगेच ९ आॅगस्टला पुन्हा एकदा तलाव बंद करण्यात आले. ते सप्टेंबर महिन्यात सुरु झाले. आता पुन्हा एकदा तलाव बंद करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. शनिवारी राज्य शासनाने जी नियमावली जाहीर केली त्यात जलतरण तलावांबरोबरच जीम, स्पा, ब्युटी पार्लर बंद करण्याचा आदेश दिला. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी (ता. ९, जानेवारी) रोजी तलाव वगळता अन्य सर्व गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत.
पुण्यात खासगी तलावांबरोबर महापालिकेच्या मालकीचेही तलाव आहेत. ते कंत्राटी पद्धतीने चालवायला दिले आहेत. यातील अनेक तलावांवर स्पर्धात्मक सराव केला जातो. पण गेल्या वर्षापासून जलतरण पटूंच्या शारीरीक क्षमतेवर तलाव वारंवार चालू-बंद करण्याच्या निर्णयामुळे नकारात्मक परिणाम झाले आहेत. आगामी काळात जलतरण स्पर्धा सुरु झाल्या तरी त्यात किती क्षमतेने भाग घेता येईल, याबद्दल खेळाडू आणि पालकांमध्ये संभ्रम आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनेही व्यवस्थित मेंटेन केलेल्या स्विमिंग पूलमधून कोरोना पसरत नाही हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. एक मीटरचे अंतर राखून पोहोल्यास ते सुरक्षित असेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वेबसाईटमध्ये नमूद करण्यात आले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईडचा वापर केला जातो. तलावाच्या पाण्याच्या फिल्टरेशनसाठी हेच रसायन किंवा कॅल्शियम हायपोक्लोराई़डचा वापर केला जातो. पहिल्या लाॅकडाऊन नंतर स्पोर्टस् अॅथाॅरिटी आॅफ इंडियाने मार्गदर्शक सूचना जारी केली होती. त्यात तलावाच्या पाण्यात क्लोरिनची मात्रा किती असावी, याचेही निर्देश होते. (Pune News)
बहुसंख्य तलावर चालक सुरुवातीपासूनच त्याच प्रमाणात क्लोरिनची मात्रा वापरतात. त्यामुळे तलावाच्या पाण्यातून कोरोनाचा प्रसार होणार नाही, असे सांगितले जाते. पण तरीही तलावांवर संक्रांत आली आहे.
- स्वोजस गोडसे, जलतरण प्रशिक्षक
सुदैवाने तलाव बंद असल्याच्या काळातले तलावांचे भाडे महापालिकेने अद्याप तरी घेतलेले नाही. पण तरीही तलाव बंद करण्याच्या काळातही तलावाची देखभाल करावी लागते. त्यासाठी किमान महिन्याला सव्वा लाख रुपयांचा खर्च येतो. तलावाची सफाई, क्लोरिन तसेच जीवरक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे पगार तलाव चालकांना द्यावेच लागतात. तलाव बंद असल्याने उत्पन्न मात्र काहीच नाही.
- भूपेन आचरेकर, तलाव चालक व जलतरण प्रशिक्षक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.