पक्षाच्या उमेदवार विरोधात बंडाचा झेंडा घेऊन रिंगणात उतरलेल्या बंडखोरांबाबत महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या २४ तासांत बंडखोरी मागे घ्या आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्या; अन्यथा कारवाईस सामोरे जा, असा इशारा काँग्रेस आणि शिवसेनेने दिला आहे. एवढेच नव्हे, तर या बंडखोरांबरोबर फिरणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी मंगळवारी एकत्र पत्रकार परिषद घेत हा इशारा दिला. यावेळी काँग्रेसचे शहर समन्वयक अजित दरेकर, शेख, मुक्तार शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.