मंचर : श्री क्षेत्र भीमशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शनासाठी ज्येष्ठनेते शरद पवार साहेब यांच्या पत्नी प्रतिभा पवार शनिवारी (ता.२६) आल्या होत्या. पण गेल्या ४४ वर्षापासून वळसे पाटील कुटुंबाशिवाय प्रथमच शिवलिंगाचे दर्शन पवार कुटुंबीयांनी घेतले.
या दौऱ्याची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. पण सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी देवेंद्र शहा हे मात्र पवार कुटुंबियांच्या स्वागतासाठी आवर्जून उपस्थित होते.
सन १९७८ मध्ये शरद पवार भीमाशंकर येथे दर्शनासाठी श्रावण महिन्यात आले होते. त्यावेळी पवार हे राज्याचे उद्योग मंत्री होते. तेव्हा दिलीप वळसे पाटील यांचे वडील माजी आमदार (स्व) दत्तात्रेय वळसे पाटील यांच्यासोबत भीमाशंकर वनखात्याच्या विश्रामगृहात मुक्कामी थांबले होते. त्यावेळी विजेची सोय नव्हती, प्रकाशासाठी कंदील व दिवे होते.
पवारांना रात्री एकच्या सुमारास थोडासा गारवा जाणवला. म्हणून ते उठून बसले. तर त्यांच्या अंगावरून एक साप सरपटत खिडकीतून बाहेर जाताना दिसला. त्या घटनेमुळे पवार सुन्न झाले. त्यांनी तत्काळ दत्तात्रेय वळसे पाटील यांना हाक मारली.
ते ही लगेच धावत आले. शरद पवार यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी दत्तात्रेय वळसे पाटील आनंदी होत म्हणाले, "साहेब, हा तर शुभशकुन आहे. आपण पहाटे भीमांशकरची पूजा करूयात.” त्यानुसार पवार यांनी पूजा केली. त्यानंतर शरद पवार मुंबईला परतले. या घटनेनंतर आठ ते दहा दिवसांत शरद पवार मुख्यमंत्री झाले.
हा किस्सा खुद्द शरद पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितला आहे. हा प्रसंग जेव्हा प्रतिभाताई यांना समजला. तेव्हापासून गेली ४४ वर्षे त्या श्रावण महिन्यात शनिवारी किंवा सोमवारी भीमाशंकरला शिवलिंगाच्या दर्शनाला येतात.
दिलीप वळसे पाटील किंवा त्यांच्या पत्नी किरणताई वळसे पाटील ह्या कामय त्यांच्यासोबत भीमाशंकरला जात होत्या. जेवणाचा बेत असायचा. तसेच पूजा, अभिषेक याची व्यवस्थाही वळसे पाटील कुटुंबीय करायचे. यंदा मात्र प्रथमच वळसे पाटील कुटुंबीय सोबतीला न घेता प्रतिभाताई पवार यांनी भीमाशंकरचे दर्शन घेतले आहे.
राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे पवार आणि वळसे पाटील कुटुंबीयांमध्ये दरी निर्माण झाल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.
दरम्यान या दौऱ्याचा कोणालाही सुगावा लागणार नाही याची काळजी पवार कुटुंबांनी घेतली होती. पण शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केला.
त्यानुसार दर्शन घेवून माघारी जात असताना मंचर जवळ निघोटवाडी येथे शहा यांच्याकडून अनाहूतपणे झालेल्या स्वागताने प्रतिभा पवार व खासदार सुप्रिया सुळे भारावून गेल्या होत्या. हसतमुखाने शहा यांचे स्वागत त्यांनी स्वीकारले. घोडेगाव येथे भीमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय काळे, उपसरपंच सोमनाथ काळे यांनी फटाक्याची आतषबाजी करून स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.