मंचर (पुणे) : पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मंचर (ता. आंबेगाव) येथील महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले असून, बाळ जन्मजात पूर्णपणे बरे असल्याचा व त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, आई दवाखान्यात आणि नातेवाईक क्वारंटाइन, अशा वेळी या बाळाचा सांभाळ कोणी करायचा असा, प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी मंचर ग्रामपंचायतीने या बाळाचा सांभाळ केला.
देव तारी त्याला कोण मारी, या उक्तीप्रमाणे कोरोना हा महाभयंकर आजार ह्या लहानग्याला स्पर्शही करू शकला नाही. पण, आईपासून बाळाला दूर ठेवा, असे डॉक्टरांनी सांगितले. मंचर ग्रामपंचायतीच्या अर्चना बेंडे व स्नेहा मिसाळ या दोन महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सोमवारी (ता. ९) चार दिवसांच्या बाळाला ताब्यात घेऊन मंचरला आणले आहे. या वेळी बाळावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या बाळाचा सांभाळ महिला कर्मचारी करत आहेत. त्यांच्या मातृत्व, कर्तुत्व व धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबईवरून प्रसूतीसाठी मंचर शहरात २८ मे रोजी आलेल्या महिलेचा कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे तिला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते. तिच्या नातेवाईकांना देखील होम कवारंटाइन केले आहे. या महिलेची सहा जून रोजी प्रसूती झाली. बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, आईला अजून डिस्चार्ज मिळाला नाही. त्यामुळे व तिच्या नातेवाईकांचाही रिपोर्ट अजून प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे 4 दिवसाच्या बाळाचा सांभाळ कोण करणार, या चिंतेत सर्वजण होते.
या वेळी सरपंच दत्ता गांजाळे यांनी पुढाकार घेतला. बाळ ताब्यात घेऊन मंचरपर्यंत आणण्याची व सांभाळण्याची जबाबदारी अर्चना बेंडे व स्नेहा मिसाळ यांनी पार पाडली. सध्या हे बाळ मंचर ग्रामपंचायतमध्ये असून, सोमवारी रात्री व मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंत बाळाचा सांभाळ केला. त्यांच्यासाठी खरेदी केलेल्या पाळण्याची आकर्षक पद्धतीने सजावट राजश्री दत्ता गांजळे, ग्रामपंचायत सदस्या संगीता बाणखेले, कविता थोरात, वंदना बाणखेले, सविता क्षीरसागर यांनी केली. मंगळवारी दुपारी नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर बाळ पाळण्यासह स्वाधीन करण्यात आले. या वेळी महिला कर्मचाऱ्यांना गहिवरून आले होते. या महिला कर्मचार्यांनी मातृत्वाचा आदर्श व धाडसाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.