पुणे : दुचाकीवरुन नातेवाईकांकडे जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्याभोवती मांजा अडकल्याने महिलेचा गळा कापला. सुदैवाने महिलेवर तत्काळ उपचार झाल्याने महिलेचा जीव वाचला, मात्र या प्रकारामुळे महिलेस मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसला. घातक मांजाला बंदी असतानाही शहरात पतंग उडविण्यासाठी त्याचा सर्रासपणे वापर होत आहे. पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांविरुद्ध सुरु असलेली कारवाई थंडावली असून दुसरीकडे महापालिकेकडून अद्यापही कारवाई होत नसल्याची सद्यस्थिती आहे.
वारजे परिसरात राहणारी 45 वर्षीय महिला 26 डिसेंबर रोजी सायंकाळी तिच्या दुचाकीवरुन कर्वेनगर येथे त्यांच्या नातेवाईकांकडे जात होत्या. कर्वेनगर येथील पुलावर त्यांची दुचाकी आली, त्यावेळी अचानक त्यांच्या गळ्याभोवती मांजा अडकल्याने, त्या दुचाकीवरुन खाली पडल्या. मांज्या गळ्याभोवती खोलवर कापला गेल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू होता. नागरीकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयामध्ये काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांच्या गळ्याभोवतीची जखम बरी होत आहे. घटनेच्यावेळी त्यांनी हेल्मेट घातला असल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, या घटनेचा त्यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. महिलेने समाजमाध्यमांद्वारे या घटनेबाबत आपला अनुभव मांडत नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये यापुर्वी मांजाने गळा कापल्याने दोन युवतींना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच दरवर्षी अनेक नागरीक व पक्षी मांजामुळे गंभीररीत्या जखमी होत आहेत. जानेवारी महिन्यातच मांजामुळे नागरीक जखमी होण्याच्या तीन ते चार घटना घडल्या आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने काही दिवसांपुर्वी बंदी असलेला मांजा विकणाऱ्या दोन विक्रेत्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून मांजाचे रीळ व रोख रक्कम जप्त केली होती. त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मात्र पोलिसांची मांजाविरोधी कारवाई थंडावली.
अशी घ्या काळजी
दुचाकीवरुन जाताना गळ्याभोवती जाड कापड गुंडाळा
जाड स्कार्फ, मफलर किंवा गळा झाकणारे कपडे वापरण्यास प्राधान्य द्या
रात्रीच्या वेळी दुचाकी सावकाश चालविण्यावर भर द्या
दुचाकी वाहन चालविताना कायम सतर्क रहा
कोठेही मांजा लटकताना दिसल्यास अग्निशामक दलास खबर द्या
महापालिका नागरीकांचा जीव जाण्याची वाट पाहतेय का ?
"पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर काही प्रमाणात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परंतु मांजामुळे नागरीक, पक्षी जखमी होत असतानाही महापालिकेकडून अजूनही मांजा विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई नाही. एखाद्या नागरीकाचा गळा मांजाने कापून त्याचा जीव गेल्यावर महापालिकेला जाग येणार आहे का ? तेव्हाच महापालिका कारवाई करणार आहे का ? ''
- अनुप खरात, नोकरदार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.