आपटाळे (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या अतिदुर्गम पश्चिम आदिवासी भागातील हातविज येथे मोबाईलला रेंज नसल्यामुळे मजुरांना जिल्हा परिषदेकडे कामाची ऑनलाईन मागणी करता आली नव्हती. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडणार होता. अखेर प्रशासनाने यातून मार्ग काढला. त्यातून येथे मनरेगा योजनेअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील गरजू मजुरांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे.
आदिवासी भागातील हातविज येथील नागरिकांना भात लागवड व अन्य शेती कामे उरकल्यानंतर गाव पातळीवर कोणताही रोजगार उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांना रोजगारासाठी पूर्व भागात दूरचा प्रवास करून जावे लागते. कोरोना महामारीमुळे मागील 4 महिन्यांत येथील नागरिकांच्या हाताला कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळू शकला नाही. तसेच, भविष्यातही रोजगार मिळण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर पुढील अडीच महिने रोजगार मिळावा, अशी मागणी मजुरांकडून केली जात आहे. त्यामुळे रोजगार मिळण्याच्या उद्देशाने हातविज ग्रामपंचायतीने मनरेगा योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीची कामे सुरू केली आहेत, अशी माहिती सरपंच भागूबाई पारधी व ग्रामसेवक वीरेंद्र गवारी यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रोजगार हमीची कामे तातडीने सुरु करावीत, यासाठी किसान सभा संघटनेने जिल्हा परिषद आणि पंचायत प्रशासनाकडे सातत्याने मागणी केलेली होती. संघटनेच्या या मागणीला पुणे जिल्हा परिषदेने सकारात्मक प्रतिसाद देऊन मजुरांना गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन कामाची मागणी नोंदविण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, हातविज गावामध्ये रेंज नसल्यामुळे आणि फाॅर्मबाबत माहिती नसल्यामुळे मजुरांना ऑनलाईन कामाची मागणी करता आली नाही.
याबाबत गटविकास अधिकारी हेमंत गरीबे यांच्या अध्यक्षतेखाली 13 जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये संपर्काची साधने नसल्यामुळे ज्या गावांमधून ऑनलाईन कामाची मागणी नोंदविली नाही, अशा गावांमध्ये प्रशासनाने पुढाकार घेऊन मजुरांकडून मागणी नोंदवावी आणि ताबडतोब कामे चालू करावीत, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला हातवीज ग्रामपंचायतने सकारात्मक प्रतिसाद देत मनरेगाअंतर्गत कामे चालू करून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे किसान सभेचे उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे यांनी सांगितले.
या वेळी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे तालुका संघटक गणपत घोडे, आदिवासी अधिकार मंचाचे प्रा. ज्ञानेश्वर सावळे, आंबेचे सरपंच मुकुंद घोडे, बिरसा मुंडा वन धन केंद्राचे अध्यक्ष गोविंद निर्मळ, रोजगार सेवक अक्षय निर्मळ यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.