पुणे - सलग दहा विजय मिळवीत अंतिम फेरीपर्यंत अपराजित मालिका राखलेला भारतीय क्रिकेट संघ जगज्जेतेपद पटकावणारच, असा ठाम आत्मविश्वास बाळगलेल्या क्रिकेटप्रेमींचा अखेर अपेक्षाभंग झाला. रविवारी कमालीची उत्कंठा निर्माण झाली असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना सुरू होताच दोन्ही डावांमध्ये प्रारंभीचा अपवाद वगळता क्रिकेटप्रेमींना हताशच व्हावे लागले.
भारतीय संघाने पहिल्या दहा षटकांत केलेल्या धावा आणि ऑस्ट्रेलियाने ५० धावांत गमावलेल्या तीन विकेट अशा अशा दोन्ही टप्प्यांवर विश्वकरंडक आपलाच अशा आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र विजयोत्सवाच्या तयारीवर अखेर पाणी पडले.
अंतिम सामना मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठी अनेक ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. भांडारकर रस्त्यावरील साने डेअरी चौक, गणेशोत्सव मंडळाच्या वतीने तुळशीबागेत अनेक क्रिकेटप्रेमी जमले होते. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, अरण्येश्वर अशा ठिकाणीही एलईडी स्क्रीनसमोर बसून क्रिकेटप्रेमी सामना पाहात होते.
भारताचा डाव सुरु झाल्यानंतर प्रारंभी चेंडू सीमापार होताच कमालीचा जल्लोष होत होता. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु झाल्यानंतरही आधी असेच चित्र होते, मात्र भारताचे विराट कोहली तसेच के. एल. राहुल असे फलंदाज मैदानावर असतानाही शांतता पसरली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यावरील पकड भक्कम करताच क्रिकेटप्रेमींना शेवट कळून चुकला. दुसरीकडे कुटुंबासोबत घरातच सामना पाहण्यासाठी विशेष तयारी केलेल्या क्रिकेटप्रेमींच्याही निराशेला अंत नव्हता.
फटाके, मिठाई अखेर घरी घेऊन जाण्याची वेळ
मंचर - आंबेगाव तालुक्यात मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द, पेठ, कळंब, पारगाव लाखणगाव येथे अनेकांनी फटाके वाजवण्याची व लाडू, पेढे वाटण्याची जोरदार तयारी केली होती. पण ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कप जिंकल्यामुळे फटाके व मिठाई घरी नेण्याच्या प्रसंगाला येथील क्रीडाप्रेमी युवक व युवतींना सामोरे जावे लागले.
मंचर घोडेगाव यासह अनेक गावात मुख्य चौकात स्क्रीन लावून तसेच हॉटेल दुकाने व घरी अटीतटीची स्पर्धा पाहत होते. भारताने फलंदाजी पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघाचे दोन खेळाडू बाद झाल्यानंतर क्रीडा प्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनेकांनी भारत जिंकणार, असे दावेही केले होते.
पण त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने दमदार खेळ करत भारतीय गोलंदाजांची खेळी परतावून लावली. ऑस्ट्रेलिया विजयी झाल्याचे पाहून अनेकांनी चौकाचौकात लावलेले स्क्रीन टीव्ही बंद केले. जेवणाचे बेतही रद्द करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.