Tree Replantation : येरवड्यातील झाडांच्या पुनर्रोपणाकडे दुर्लक्षच

येरवडा येथील मनोरुग्णालय व जेल रस्त्यावरील शंभर वर्षांहून अधिक जुनी वडाची झाडे उन्मळून पडण्याची घटना मागील आठवड्यात घडली.
Tree Collapse
Tree Collapsesakal
Updated on

पुणे - येरवडा येथील मनोरुग्णालय व जेल रस्त्यावरील शंभर वर्षांहून अधिक जुनी वडाची झाडे उन्मळून पडण्याची घटना मागील आठवड्यात घडली. या घटनेला दहा दिवस उलटले, तरीही संबंधित झाडांच्या पुनर्रोपणासाठी वेळ काढण्याची तसदी महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही. स्वयंसेवी संस्थेने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता जाग आलेल्या महापालिका प्रशासनाकडून झाडांच्या पुनर्रोपणासाठी खड्डे घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने पुणे शहराला झोडपले. त्याचबरोबर वेगवान वाऱ्यांमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांतील मोठमोठी झाडे उन्मळून पडली. पडलेली झाडे बाजूला करून अग्निशमन दल, महापालिका प्रशासनाने तात्पुरती तत्परता दाखविली. मात्र, उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी महापालिका प्रशासनाला वेळ मिळाला नसल्याची सद्यःस्थिती आहे.

येरवडा येथील मनोरुग्णालय व जेल रस्त्यावरील १०० वर्षांहून अधिक जुनी वडाची तीन झाडे मागील आठवड्यात कोसळली. मोठमोठी झाडे मुळासकट उन्मळून पडल्याने त्यांचे पुनर्रोपण व्हावे, यासाठी ‘पुणे संवाद’ या स्वयंसेवी संस्थेचे समन्वयक रूपेश केसेकर, अमित सिंग, विजय सुरतकल, चैतन्य केट, हेमा चारी यांच्याकडून महापालिकेच्या येरवडा नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठपुरावा केला. मात्र कामगार नाहीत, झाडपडीच्या इतर घटना आहेत, इतर कामे आहेत, अशी कारणे सांगून या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

दरम्यान, स्वयंसेवी संस्थेच्या आठ ते दहा दिवसांच्या पाठपुराव्यानंतरही क्षेत्रीय कार्यालयाकडून उडवाउडवीचीच उत्तरे दिली जात होती. अखेर मंगळवारी क्षेत्रीय कार्यालयाने झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी खड्डे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता संबंधित तीन झाडांचे त्यांच्या मूळ जागेवरच पुनर्रोपण होण्याची शक्‍यता आहे. मात्र त्यासाठी प्रशासनाला आणखी किती दिवस लागणार? हा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

झाडे पडण्याचे कारण नैसर्गिक की कृत्रिम?

वडाची झाडे शंभर वर्ष जुनी आहेत. ही झाडे मुख्य रस्त्यालगतच आहे. या परिसरात विविध विकासकामे करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित झाडे पाडण्यात आली नाहीत ना? असा संशय स्वयंसेवी संस्थेने उपस्थित केला आहे. जलवाहिनी, सांडपाणी वाहिनीसाठी रस्त्यांचे खोदकाम करताना झाडांच्या मुळांना इजा झाली आहे. त्यातच झाडांच्या पारंब्याही कापल्या जात असल्याने झाडे उन्मळून पडण्याची घटना घडली आहे.

वडाची झाडे एकाच आठवड्यात पडली आहेत. या झाडांचे पुनर्रोपण व्हावे, यासाठी आठ दिवसांपासून क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहोत. पण त्यांच्याकडून चालढकलपणा केला जात आहे. आज त्यांनी खड्डे घेणे सुरू केले आहे.

- रूपेश केसेकर, समन्वयक, पुणे संवाद

पावसामुळे झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे तेथील झाडे बाजूला काढण्यात येत असल्याने विलंब झाला. संबंधित वडाच्या झाडांचे त्यांच्या मूळ ठिकाणीच पुनर्रोपण केले जाणार आहे. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने दोन दिवसांत झाडांचे पुनर्रोपण केले जाईल.

-चंद्रशेखर नागटिळक, क्षेत्रीय अधिकारी, येरवडा-नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.