सचिन वाझे-अंबानी प्रकरणाचा तपास बारामतीच्या IPS अधिकाऱ्याकडे

Baramati,IPS Officer,Vikram Khalate, Sachin Vaze, Ambani Bomb Scare Case
Baramati,IPS Officer,Vikram Khalate, Sachin Vaze, Ambani Bomb Scare Case
Updated on

सोमेश्वर नगर : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोरील कारमध्ये स्फोटके आढळल्याच्या आणि सचिन वाझे प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी बारामती तालुक्यातील लाटे गावच्या सुपुत्रावर आहे. 2008-09 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विक्रम मुकुंदराव खलाटे हे त्यांचे नाव. नुकताच गुणवत्तापूर्ण व वेगवान तपास केल्याबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे दोन वेळा विशेष पदक त्यांना मिळाले आहे. पश्चिम बंगाल व नागालँडमध्येही सिंघम ठरलेला हा अधिकारी मुंबईतही सचिन वाझे प्रकरणाचा रोखठोक तपास करेल असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

लाटे (ता. बारामती) येथील विक्रम खलाटे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. जिल्हा परिषद शाळा लाटे येथे प्राथमिक शिक्षण तर 'रयत'च्या सिध्देश्वर विद्यालय कोऱ्हाळे येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. यानंतर माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पदवीनंतर नोकऱ्या त्या काळात सहज मिळत होत्या परंतु जगाला काही वेगळे करून दाखवायचे आणि समाजाला उपयोगी पडायचे या जिद्दीतून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेत उतरले. चौथ्या प्रयत्नात 2008-09 च्या बॅचमध्ये थेट आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी निवड झाली. लाटेसारख्या खमक्या गावात आणि शेताच्या मातीत वाढलेल्या या तरूणाने सुरवातीला नागालँडमध्ये आपल्या सिंघम कामगिरीचा दबदबा तयार केला. नागालँडमध्ये निवडणुका हिंसेशिवाय होतच नव्हत्या. खलाटे अधिकारी असलेल्या मोकोकचुंग या जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदा 2011 मध्ये शांततेत निवडणुका पार पडल्या. थेट लोकांमध्ये उतरून लोकशाही प्रक्रियेबद्दल विश्वास निर्माण करणे, हत्यारे जप्त करणे, वादग्रस्त लोकांवर वचक ठेवणे या माध्यमातून त्यांनी हे यश मिळविले.

या कामगिरीबद्दल राज्यपालांचे सुवर्णपदक त्यांना मिळाले. या कामगिरीमुळे त्यांना एनआयएच्या (नॅशनल इन्व्हीस्टीगेशन एजन्सी) पश्चिम बंगाल विभागाचे प्रमुख म्हणून संधी मिळाली. वर्धमान जिल्ह्यामध्ये बाँबस्फोटात दोन लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा सखोल तपास खलाटे यांनी केला. याचे धागेदोरे थेट बांग्लादेश मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेपर्यंत पोचले. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढत त्यांनी तेविस अतिरेक्यांना जेरबंद करण्याचा भीमपराक्रम केला. यानंतर त्यांच्यावर एनआयएच्या मुंबई कार्यालयाचे प्रमुख म्हणून निवड झाली. गोवा, महाराष्ट्र आणि गुजराथ या तीन जिल्ह्याचे हे कार्यालय आहे. अडीच वर्षापासून ते काम करत आहेत. मागील पंधरा ऑगस्टला त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने गुणवत्तापूर्ण व वेगवान तपास केल्याबद्दल दुसऱ्यांदा 'विशेष पदक' देऊन गौरव केला.

जेट एअरवेजच्या मुंबई-दिल्ली या विमानाच्या शौचालयात 'विमानाचे अपहरण करणार आणि बाँब ब्लास्ट करणार' अशी इंग्लिश व उर्दू भाषेत चिठ्ठी लिहून ठेवली गेली होती. पायलटच्या निदर्शनास आल्यावर अहमदाबाद येथे ते विमान उतरविले. साध्या चिठ्ठीवरून खलाटे यांनी सखोल तपास करत आरोपी शोधला. त्याला जन्मठेप आणि पाच कोटींचा दंड झाला होता. त्याआधी बनावट चलनाबद्दलची गोपनिय माहिती मिळविली आणि त्याआधारे दहा राज्यात गुन्हे नोंदविले होते. साध्यासुध्या गोपनिय माहितीवरून इतका प्रचंड तपास करण्याच्या कामगिरीबाबत त्यांचा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असाधारण असूचना पदक देऊन गौरव झाला होता. तपासाचा असा दांडगा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यावर आता सचिन वाझे प्रकरणाची जबाबदारी येऊन पडली आहे.  

अंबानींच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरेलली गाडी आढळून आली होती. त्यानंतर गाडीमालक मनसुख हिरेन याचा धक्कादायक मृत्यू समोर आला. वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली. हे धआगे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोचत असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र एटीएसदेखील या प्रकरणाचा तपास करत आहे. संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.  या प्रकरणाची पाळेमुळे खलाटे खणून काढतील असा बारामतीकरांना विश्वास वाटत आहे.   

लाटे येथील सोमेश्वर कारखान्याचे संचालक सचिन खलाटे म्हणाले, मागील बारा-तेरा वर्षात विक्रम खलाटे यांनी गावाचे, तालुक्याचे नाव देशात उंचावले आहे. सामान्य कुटुंबातून इतक्या उंचीला पोचले आहेत. आता नव्या वादग्रस्त प्रकरणात राज्यात, देशात काहीही चर्चा चालू असल्या तरीही विक्रम खलाटे हे शांत डोक्याने सखोल तपास करतील आणि लोकांसमोर सत्य आणतील. शेतकऱ्याचा ग्रामीण भागात वाढलेला हा मुलगा कणखऱपणे सामोरा जाईल.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()