नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणूक निकालांच्या आधी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिदरसिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली. ‘ही सर्वसामान्य भेट होती,‘ असे त्यांनी सांगून आजच्या दिल्ली दौऱ्यांचे कारण गुलदस्तात ठेवले. निकालांनंतरच्या राजकीय घडामोडींबद्दलचा अंदाज वर्तविण्यात आपण काही ज्योतिषी नाही असेही या ७९ वर्षीय कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सावधपणे सांगितले.
निवडणूक होण्याआधी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी शहा यांच्याशी अनेकदा गाठीभेटी घेतल्या होत्या. मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्यावर कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाच्या सूचनेनुसार शहा यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग व ज्येष्ठ अकाली नेते सुखदेवसिंग ढिंढसा यांच्या पक्षाबरोबर आघाडी केली. राज्यातील ११७ जागांपैकी भाजपने आजवरच्या सर्वाधिक ६७ जागा यंदा लढविल्या होत्या. कॅप्टन अमरिंदरसिंग -भाजप आघाडीने राज्यात जोर लावला तरी मुख्य लढत कॉंग्रेस व आम आदमी पक्ष यांच्यातच होती व बसप, अकाली दलासाठी फारशी आशादायक परिस्थिती नसल्याचे वातावरण आहे.
यंदा पंजाबात शिरोमणी अकाली दलाविरूद्ध रोष आहेच. पण खुद्द कॅप्टन अमरिंदरसिंग व ढिंढसा हेही यंदा ‘रेड झोन' मध्ये असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. पंजाबात आम आदमी पक्षाचा जोर दिसत असला तरी अमरिंदरसिंग यांच्याच नेतृत्वाखाली मजबूत झालेले कॉंग्रेसचे संघटनात्मक जाळे अजूनही कायम असल्याचेही निरीक्षण नोंदविले जाते. या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी दुपारी शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याबरोबर खलबते केली. मात्र पत्रकारांशी बोलताना त्यांनी, आमच्यामध्ये सर्वसामान्य चर्चा झाली.
या भेटीचा निवडणुकीशी काही संबंध नाही असा सूर लावला. ते म्हणाले की निवडणुकीनंतर राज्यात कोणत्या नव्या राजकीय आघाड्या होतील हे मी सांगू शकत नाही. तशी भविष्यवाणी करण्यास मी ज्योतिषी (पंडित) नाही. निवडणुकीत माझ्या पक्षाने व भाजपने चांगली कामगिरी केली आह. बघू या काय होते , असे ते म्हणाले. दरम्यान, उत्तर प्रदेशासह उत्तराखंड, गोवा व मणिपूर या चारही राज्यांत भाजपच स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्ता मिळवेल, असा विश्वास सत्तारूढ पक्षातर्फे नुकताच वर्तविण्यात आला. तथापि पंजाबबाबत असा विश्वास व्यक्त करणे टाळून शहा यांनी पंजाबातील संभाव्य पराभवाची अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनानंतर भाजप विरूद्धचा रोष कायम अाहे. ग्रामीण पंजाबमध्ये याचा थेट फटका भाजपला बसेल हे उघड दिसते. निवडणूक
प्रचाराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबातील एका उड्डाणपुलावर अडकून पडल्याचे प्रकरण भाजपने तापविले होते. हा पंतप्रधानांच्या हत्येचा कट होता व कॉंग्रेसचे चरणजीतसिंग चन्नी सरकारच त्यासाठी जबाबदार आहे, असा थेट आरोप भाजप नेते व केंद्रीय मंत्र्यांनी केला होता. या प्रचाराचाही पक्षाला निर्णायक लाभ होणार नसल्याचे फीडबॅक पक्षाकडे आले आहेत.
सकारात्मक परिणाम येतील: नड्डा
संपूर्ण पंजाबमध्ये मोदी सरकारने समाजातील गरीब-शोषित-पीडीत-वंचितांच्या, विशेषतः शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणाच्या अनेक योजना राबविल्या त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास शहा व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला होता. मात्र पंजाबमध्ये सत्तेवर भाजप येणार असे सांगण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळले. इतिहासात प्रथमच भाजप या राज्यात ६५ पेक्षा जास्त जागावर लढत आहे असे सांगून नड्डा थांबले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.