पंजाबमध्ये निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांबाबत कुमार विश्वास यांच्या दाव्यावरून राजकीय गदारोळ वाढत आहे. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी शुक्रवारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना आम आदमी पार्टी (AAP) आणि बंदी असलेल्या शीख फॉर जस्टिस (SFJ) यांच्यातील कथित संबंधांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान शहा यांनी पक्षाचे नाव न घेता, ते स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेत असल्याचे सांगितले आहे. राज्यातील निवडणुका तोंडावर आलेल्या असताना, चरणजित सिंग चन्नी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोप करत ते शिख फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेच्या संपर्कात असल्याचा असा दावा करणारे पत्र गृहमंत्र्यांना लिहिले होते. त्यानंतर गृहमंत्रालयाकडून या प्रकरणात उत्तर देण्यात आले आहे.
आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ, चन्नी यांनी शिख फॉर जस्टिसचे कायदेशीर सल्लागार गुरपतवंत सिंग पन्नू यांचे पत्र जोडले आहे. ज्यामध्ये, "2017 मधील राज्य विधानसभेच्या निवडणुकीत SFJ ने AAP ला पाठिंबा दिल्याचा उल्लेख आहे आणि त्याचप्रमाणे या निवडणुकांमध्ये देखील SFJ ने मतदारांना आम आदमी पक्षाला मत देण्याचे आवाहन केले आहे," असे चन्नी यांनी म्हटले आहे.
फुटीरतावादी संघटनेच्या संपर्कात राहणे आणि निवडणुकीसाठी त्यांची मदत घेणे ही देशाच्या एकात्मतेसाठी अत्यंत गंभीर बाब आहे, असे अमित शहा यांनी चन्नी यांना दिलेल्या उत्तरात लिहिले आहे. असे लोक सत्तेत येण्यासाठी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करत आहेत हे लज्जास्पद आहे, असे देखील पत्रात नमूद करण्यात आले आहे.
चन्नी यांनी त्यांच्या पत्रात AAP सह-संस्थापक आणि AAP पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे माजी सहकारी राहिलेले कुमार विश्वास यांनी अलीकडेच दावा केलेल्या खळबळजनक खुलाशांचा उल्लेख केला आहे विश्वास यांनी देखील केजरीवाल हे खलिस्तानी सैन्याच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. "या आरोपांची सर्वसमावेशकपणे चौकशी करणे आणि त्यानुसार आवश्यक कारवाई करणे आवश्यक आहे." असे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.