Punjab : कॉंग्रेसने चरणजितसिंग यांचीच निवड का केली? वाचा जातीय समीकरणे

जाणून घ्या पंजाबच्या निवडणुकांचे अपडेट्स
Punjab Election
Punjab ElectionSakal
Updated on

चंदीगड : राज्यात सर्वाधिक असलेल्या दलित मतांच्या आधारावर सत्ता राखण्यासाठी कॉंग्रेसने पंजाबमध्ये चरणजितसिंह चन्नी यांचे कार्ड पुन्हा खेळले आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या पंजाब वर्तु्ळातून समाधान व्यक्त होत असून पुन्हा सत्तारूढ होण्याच्या प्रयत्नांनाही उभारी आली आहे. पंजाबमध्ये दलित सर्वाधिक म्हणजे 32 टक्के आहेत. त्या खालोखाल ओबीसी आणि अन्य जातींचा प्रभाव आहे. (Punjab Assembly Election Updates)

पंजाबची सत्ता दिर्घकाळ जाट- सिद्धू यांच्याकडेच राहिली असली तरी, संकटाच्या काळात हक्काच्या दलित मतांवरच कॉंग्रेसची भिस्त असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पंजाबच्या माळवा प्रांतात विधानसभेचे 69 तर, मांझामध्ये 25 आणि दोआबामध्ये 23 मतदारसंघ आहेत. दोआबामध्ये सर्वाधिक दलित तर, माळवामध्ये दलित मतांची संख्या लक्षणीय आहे. सत्तेची गाडी या दोन प्रांतातून जाते, त्याचाही विचार करण्यात आला आहे.

विधानसभेच्या एकूण 117 जागांपैकी 34 जागा राखीव आहे. तर, लोकसभेच्याही 13 मतदारसंघातील 4 राखीव आहेत. जातीचे समीकरण चन्नी यांना अनुकूल असले तरी, पक्षातंर्गतही त्यांना मिळालेले पाठबळ कॉंग्रेस हायकमांडच्या दृष्टिने सोयीचे ठरले आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही चन्नी यांना पाठिंबा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष असलेले नवज्योतसिंग सिद्धू यांची त्यांच्याच मतदारसंघात दमछाक होत आहे. सिद्धू यांची लोकप्रियता असली तरी मतांमध्ये ती परावर्तीत होईल, अशी शक्यता कमी असल्याचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री पद नाही मिळाले तर आम्ही पुन्हा आमच्या क्षेत्रात जाऊ, असे सिद्धू यांच्या पत्नी तीन दिवसांपूर्वी म्हटल्या होत्या, त्याचाही दाखला कॉंग्रेस कार्यकर्ते देत आहेत.

चन्नी यांना सध्या तरी पक्षातून आव्हान मिळेल, अशी स्थिती नाही. तसेच सिद्धू जाट समाजाचे प्रतिनिधीत्त्व करतात. हा समाज मतपेटीतून नाराजी व्यक्त करेल, अशी शक्यता कमी आहे. कारण या निवडणुकीत आम आदमी पार्टीने सगळ्याच राजकीय पक्षांपुढे सध्या तगडे आव्हान निर्माण केले आहे. तसेच चन्नी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या घोषणेमुळे शिरोमणी अकाली दल- बहुजन समाज पक्षाच्या युतीपुढेही आव्हान निर्माण झाले असून 22 शेतकरी संघटनांच्या संयुक्त समाज मोर्चातील शेतकरीही चलबिचल होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कृषी विषयक समस्या असल्यास शेतकरी हे शेतकरी संघटनांना साथ देतात आणि निवडणुकीच्या काळात सोयीचा राजकीय पक्ष निवडतात, हे या पूर्वीही पंजाबमध्ये अनुभवास आले आहे.

चन्नी यांच्याबद्दलच्या घोषणेमुळे अन्य मागासवर्गीयही साथ देतील, अशी कॉंग्रेसला अपेक्षा आहे. त्यामुळेच चन्नी यांची निवड जाहीर करून कॉंग्रेसने आप ला ऱोखतानाच पक्षातही चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री पंजाबच्या गेल्या 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दलित चेहऱ्याच्या आधारे कॉंग्रेस विधानसभा निवडणूक लढवित आहे. राज्यातून या पूर्वी दलित वर्गातून ग्यानी झैलसिंग आणि बुटासिंग यांना पक्षाने महत्त्वाची पदे दिली आहेत. झैलसिंग तर, राष्ट्रपतीही होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच दलित चेहऱा निवडणुकीपूर्वी जाहीर करून कॉंग्रेसने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.