महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनामागे डर्टी पॉलिटिक्स? राष्ट्रपती राजवटीचा खेळ?
संपूर्ण देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला तर देशात गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा रुग्णवाढीची परिस्थिती उद्भवली आहे. यातही महत्त्वाची गोष्ट अशी की, महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत झपाट्याने वाढत आहे. जितके रुग्ण दरदिवशी भारतात सापडत आहेत त्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला आहे. केंद्रात सत्तेवर असणारा भाजप पक्ष या पाचही ठिकाणी आपला जोर लावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे सगळेच स्टार प्रचारक या प्रचारसभांमध्ये मोठमोठ्या जनसंख्येच्या उपस्थितीत प्रचारसभा घेत आहेत. या पाचही ठिकाणी कोरोनाचे नियम काटेकोरपणाने पाळले जात आहेत, अशी परिस्थिती मुळीच नाहीये, हे वास्तव आहे. मात्र, तरीही या राज्यांत अथवा इतरही राज्यात कोरोना आकडेवारी आटोक्यात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र आणि पंजाबमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक विशेष पथक पाठवलं होतं. त्या पथकाने आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले आहेत. पंजाबमधील शेतकरी आंदोलनाला लक्ष्य करणे तर महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडणे, अशा राजकीय द्वेषापोटी हे घडतंय का? महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यात देखील कोरोनाची इतकी गंभीर परिस्थिती नाहीये. मात्र, असं नेमकं काय कारण आहे की, महाराष्ट्रातच कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत असून इतर राज्यात मात्र सारी परिस्थिती आलबेल आहे? हा सवाल सातत्याने विचारण्यात येत आहे. सोशल मीडियावर याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
राज्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न?
यामागे काही राजकारण आहे का? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ही खेळी असल्याचीही चर्चा सुरु आहे. अलिकडच्या काही दिवसांत राज्य सरकार 'सचिन वाझे' प्रकरण, MPSC परीक्षा गोंधळ, पूजा चव्हाण प्रकरण, वाढत्या वीजबिलाचा मुद्दा, सेलिब्रिटींचे ट्विट्स आणि राज्यसरकारची भुमिका, अर्णब गोस्वामी प्रकरण, कंगना रणौत प्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण, सुशांत सिंह प्रकरण या आणि अशा अनेक प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहे. या मुद्यांवरुनच सातत्याने सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न देखील विरोधकांकडून झाला आहे. केंद्र सरकार आधीपासूनच अडचणीत असलेल्या ठाकरे सरकारला आणखीनच कोंडीत टाकण्याच्या प्रयत्नात आहे का? की अडचणीत असलेलं राज्य सरकार स्वत:ला वाचवण्यासाठी कोरोनाचा आसरा घेतंय? राज्यातील परिस्थितीवरुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही मध्ये मध्ये डोकं वर काढताना दिसते तर येत्या चार ते पाच महिन्यांतच आमचं सरकार येईल, असा दावा भाजपचे नेते वरचेवर करताना दिसतात. कोरोनाच्या वाढत्या संख्येमागे काही पॉलिटीकल स्ट्रॅटेजी असावी का? अशी चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. हे सारे प्रश्न अनुत्तरित असले तरीही कोरोनाची आकडेवारी भयानक वाढते आहे, हे मात्र महाराष्ट्रातील चिंताजनक वास्तव आहे.
यासंदर्भातच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अलिकडेच प्रश्न विचाराला होता की, "महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात कोरोना नाही, फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय ? तुमचे घाणेरडे प्रकरण बाहेर येतायेत म्हणून कोरोना वाढतोय का? सरकारचं कोरोनावर का कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे?"
महाराष्ट्रात 14 तारखेला होणारी महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित तारखेच्या दोन दिवस आधीच पुढे ढकलण्यात आली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव हे कारण सांगून ही परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आणि ते रस्त्यावर उतरले. यावेळी एकच युक्तीवाद प्रामुख्याने करण्यात आला तो म्हणजे इतर राज्यातील निवडणुका, त्यांचे प्रचार दौरे, थिएटर्स, प्रवास या साऱ्या गोष्टी नियमांची बंधनं घालून होऊ शकतात तर मग ही परीक्षा का होऊ शकत नाही?
हेही वाचा - देवनागरीतील पहिल्या भगवद्गीतेची छपाई कोठे व कशी झाली?
काय सांगते आकडेवारी?
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 35,871 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 23,179 रुग्ण महाराष्ट्रातील आहे. म्हणजे देशातील अर्ध्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्रातच सापडत आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.26% झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना स्थिती बिघडत चालल्याने राज्यात नव्या कठोर निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला आहे. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये परिस्थिती आवाक्यात असल्याचं चित्र आहे. काल संपूर्ण देशातील सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी 65% रुग्ण फक्त एकट्या महाराष्ट्रातले आहेत. मात्र महाराष्ट्रातच चिंताजनक रुग्णवाढ कशी?
निवडणुका असलेल्या राज्यांची कोरोना परिस्थिती
देशात पाच राज्यांमध्ये या मार्च अखेरीपासून विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगाल, तमीळनाडू, केरळ, आसाम या राज्यांत तर पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात सध्या निवडणुकीचा जोर आहे. या राज्यांमध्ये प्रचारसभांचा जोर आहे. लाखोंच्या संख्येने लोक जमत आहेत. मात्र, तरीही या राज्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव मामुली आहे.
गेल्या 24 तासांत सापडलेले रुग्ण
- केरळ - 2098
- तमीळनाडू - 945
- पश्चिम बंगाल - 303
- आसाम - 33
- पुदुच्चेरी - 52
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं मुख्य सचिवांना पत्र
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. यासंबंधीचं पत्र केंद्रीय समितीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलं आहे. केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यात कोरोना स्थितीवर गंभीर पावलं उचलली जात नसल्याची टिप्पणी देखील केली आहे. 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान केंद्रीय समिती राज्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कोरोनाविषयक सुविधांचा आढावा या समितीने घेतला होता. या समितीने 8 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.
महाराष्ट्रात सक्षम आणि संवेदनशील कोरोना सर्वेक्षण
महाराष्ट्रातच इतकी तफावती रुग्णवाढ का? यासंदर्भात महाराष्ट्र राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, यातील राजकारणाचा भाग वगळला तर महाराष्ट्रातील आकडेवारीमागचं मुख्य कारण सर्वेक्षण व्यवस्था सक्षम आणि संवेदनशील असणं हे आहे. त्यामुळे सर्वेक्षणाअंती घट किंवा वाढ आपण ताबोडतोब रिपोर्टींग करत आहोत. जितक्या चांगल्या पद्धतीने कोरोनाच्या चाचण्या, त्यातील खरेपणा आणि एकूण आकडेवारीचं सर्वेक्षण होईल, तेच चित्र आपल्याला आकडेवारीमध्ये दिसून येईल. उदाहरणार्थ, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात जितके रुग्ण सापडताहेत तितके एकूण रुग्ण विदर्भाला लागून असलेल्या संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये सापडत आहेत. या इतक्या मोठ्या तफावतीमागचं मुख्य कारण सर्वेक्षण हेच आहे. थंडीचा कडाका, ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि लग्न समारंभे ही काही प्रमुख कारणे रुग्णवाढीमागे निश्चितच आहेत. विषाणूच्या जनुकीय रचनेच्या स्वरुपामध्ये काही बदल झालेत का, ज्यामुळे ही रुग्णवाढ वेगाने होत आहे? यांसदर्भातील अभ्यास देखील सध्या सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.